मुंबई : महायुती सरकारने राज्यातील शेतक-यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेतील दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीच्या दुस-या हप्त्याच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. दुस-या टप्प्यात ५०८६ कोटी रुपये वर्ग करत ६ लाखांहून अधिक शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महायुती सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात ७ ऑगस्टला ५०२९ कोटी वितरीत करत ६ लाख २२ हजार २०७ शेतक-यांची कर्जमाफी करण्यात आली होती. आज दुस-या टप्प्यात ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतक-यांना ५०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेसाठी टप्प्या टप्प्याने निधी वितरीत केला जात आहे. या कर्जमाफीमध्ये साधारणपणे ३२ लाखांहून अधिक शेतक-यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. तर, २३ लाखांहून अधिक शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ ५६ लाख शेतक-यांना होणं अपेक्षित आहे.
आतापर्यंत किती शेतक-यांची कर्जमाफी?
राज्य सरकाकडून आतापर्यंत दोन टप्प्यात १०११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ १२ लाख ५८ हजार २४३ शेतक-यांना देण्यात आला आहे. कर्जमाफीतील पात्र शेतक-यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक असून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत नियंत्रित केली जात आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
















