नवी दिल्ली : राजकारण्यांचा पोषाख नेहमीच चर्चेचा विषय असतो. पांढरा शुभ्र सदरा हा राजकारण्यांचा ठरलेला पोषाख आहे. त्यावर काहीजण जॅकेट परिधान करून पोषाखाचा लूक बदलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजकारण्यांचा हा नेहमीचा अटायर बदलत चालला आहे. सार्वजनिक सभांमध्येही काही नेते मंडळी टी-शर्ट किंवा फॉर्मल्स घालून यायला लागले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या रंगीबेरंगी शर्टचीही चर्चा होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी राजकारण्यांच्या पोशाखाच्या बाबतीत एक नवीन पायंडा पाडत आहेत. ५६ वर्षांचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२२ मधील त्यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान टी-शर्ट घालण्यास सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ते घालत असलेले नवीन टी-शर्ट पूर्णपणे वेगळे आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यानच्या भारत जोडो यात्रेदरम्यान, गांधींनी पांढ-या टी-शर्टमध्ये पदयात्रा करत एक स्पोर्टी लूक कायम ठेवला होता. अगदी हिवाळ्याच्या दिवसांतही त्यांनी टी-शर्टच परिधान केला होता. त्यानंतर, पक्षाच्या कार्यक्रमांपासून राजकीय दौ-यांपर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये ते सातत्याने टी-शर्टमध्येच दिसले.
तसंच, पूर्वी केवळ कुर्ता-पायजमा घालणारे अनेक काँग्रेस नेतेही टी-शर्ट घालू लागले. अलाहाबादमधील विद्यार्थ्यांसोबतच्या संवादादरम्यान त्यांनी गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. तर पुण्यात त्यांनी पिवळा शर्ट परिधान केला होता. पुण्याच्या कार्यक्रमात प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, तिथे गांधींनी महिलांची सुरक्षा, स्वातंर्त्य आणि त्यांच्या हक्कांच्या मुद्यांवर संवाद साधला. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे जेन झी तरुण आणि महिला या दोन्ही घटकांवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करत आहेत.
गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाने तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवलं आहे, कारण या दोन्ही घटकांचा निवडणुकीच्या निकालांवर मोठा प्रभाव पडतो. आता काँग्रेसनेही अशाच प्रकारची रणनीती अवलंबली आहे, मात्र त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. काँग्रेस आता जेन झी तरुण आणि महिला मतदारांवर विशेष भर देत आहे, जे आगामी निवडणुकांचे भवितव्य ठरवणार आहेत.
छात्रों की गूंज कार्यक्रमात रंगीबेरंगी पोषाख
आता पेपरफुटीच्या मुद्यांवरून थेट जेन झी तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी राहुल गांधी देशभरात छात्रों की गूंज कार्यक्रम राबवत आहेत. यासाठी त्यांनी रंगीबेरंगी शर्ट्सना पसंती दिली आहे. राहुल गांधींच्या या शर्ट लूकवरून इतर राजकारण्यांनी त्यांच्यावर वारंवार टीका केली आहे. आता तर त्यांनी रंगीबेरंगी शर्ट्स घालून आपल्या या शैलीचा अधिकच विस्तार केला आहे. कोटा येथे पेपरफुटीच्या मुद्द्यावर त्यांनी पहिल्या छात्रों की गूंज कार्यक्रमाची सुरुवात केली, तेव्हा त्यांनी निळा टी- शर्ट घातला होता. डेहराडूनमध्ये त्यांनी टी-शर्टऐवजी शर्ट घातला होता.
















