काठमांडू : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण महापुरातील मृतांची संख्या शुक्रवारी ६०० वर पोहोचली आहे. अद्याप १,४६८ नागरिक अद्याप बेपत्ता असून त्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या पुरामुळे नव्याने तयार झालेल्या एका कृत्रिम तलावामुळे पुन्हा एकदा महापूर येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता नेपाळसह भारताचेदेखील टेन्शन वाढले आहे.
नेपाळ-तिबेट सीमेवर हिमस्खलन झाल्यामुळे चिखल आणि पाण्याचा प्रचंड लोंढा मध्य नेपाळमध्ये धडकला. भोटे कोशी नदीला आलेल्या या महापुरात शहरे आणि गावे जलमय झाली असून अनेक घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. रसुवा आणि नुवाकोटमधील अनेक गावे चिखल व ढिगा-याखाली गाडली गेली असून जलविद्युत प्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे.
रस्ते आणि पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यात बचाव पथकांना मोठ्या अडचणी येत आहेत. घरे, बाजारपेठा, शेती आणि सरकारी इमारती चिखलाखाली दबल्या गेल्या आहेत. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण वस्त्या नामशेष झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नदीकिनारी आणि दुर्गम भागात बचावकार्य सुरू असतानाच, भोटे कोशी नदीच्या उगमस्थळाजवळ नव्याने तयार झालेल्या तलावामुळे संकट अधिक गडद झाले आहे. हा तलाव फुटल्यास पाण्याचा मोठा लोंढा पुन्हा खाली येऊन परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
















