मुंबई : प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळ बैठक आणि मंत्रालयातील पूर्वनियोजित बैठका सोडून सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयात बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी शिवसेना फुटीच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमी शिंदे दिल्लीत आले असून ते केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यलयाकडून आजच्या त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार शिंदे हे आज मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होणार होते. याशिवाय शिंदे हे मुंबई महानगर क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा बृहत आराखडा आणि बस परिवहन सेवेचा कायापालट करणे तसेच ठाणे विकास आराखडा सादरीकरणाच्या संदर्भात आयोजित बैठकीला उपस्थित राहणार होते. मात्र, या बैठकांकडे पाठ करून शिंदे आज तातडीने दिल्लीला रवाना झाले.
दरम्यान, दिल्लीत पक्षाच्या राज्य प्रमुखांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने पदाधिका-यांची भेट होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे यावेळी वकिलांशी चर्चा होणार असल्याचे शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
















