निलंगा : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निलंगा तालुक्यातील निटूर आणि अंबुलगा बु. येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) सकाळी ११ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखल्याने दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अंबुलगा बु. मोड येथे लातूर-झहीराबाद महामार्ग तसेच लांबोटा-तोगरी महामार्गावरील वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. ऐन रहदारीच्या वेळी आंदोलन झाल्याने दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. सकाळपासूनच निटूर, अंबुलगा बु. आणि परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या अधिका-यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांचे निवेदन शासनाकडे सादर करून मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात निटूर, अंबुलगा बु. तसेच परिसरातील मराठा समाजबांधव, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















