निलंगा : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मसलगा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सुमारे सहा तास शोले स्टाईल’ आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून मराठा बांधवांनी आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंखे, उपाध्यक्ष हनुमंत पाटील यांच्यासह सकल मराठा बांधवांनी सकाळी नऊच्या सुमारास आंदोलनास सुरुवात केली. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भर उन्हात पाणीपुरवठ्याच्या टाकीवर बसून आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या.
आंदोलनाची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला. सरपंच गणेश शेळके यांनी टाकीवर जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनीही दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर दुपारी तीनच्या सुमारास आंदोलनकर्ते टाकीवरून खाली उतरले. यावेळी पोलीस जमादार विकास बोंग, पोलिस भोसले, माधव कांबळे, पोलिस पाटील संतोष नरहरे, मंडळ अधिकारी जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष तोरखडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
















