चाकूर : प्रतिनिधी
बसमध्ये प्रवासी चढत असतानाच चालकाने बस पुढे नेल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या वडवळ नागनाथ येथील ५५ वर्षीय शेतक-याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्रदीप बाबुराव मिरकले असे मयताचे नाव आहे. या घटनेने वडवळ नागनाथ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडवळ नागनाथ येथील शेतकरी प्रदीप बाबुराव मिरकले (वय ५५) हे ८ सप्टेंबर रोजी कर्जाच्या बेबाकी प्रमाणपत्रासाठी चाकूर येथे आले होते. आपले काम आटोपल्यानंतर दुपारी गावाकडे जाण्यासाठी ते चाकूर बसस्थानकात आले. यावेळी अहमदपूरकडून लातूरकडे जाणारी एमएच १४ एनई ६०८१ क्रमांकाची बस बसस्थानकात होती.
गावाकडे जाण्यासाठी मिरकले हे बसमध्ये चढत असतानाच चालक आनंद लक्ष्मण जोगपेटे यांनी बस पुढे नेल्याने त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्याचवेळी बसचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रकरणी शिवराज शिवमूर्ती जनगावे (वय ६१, रा. वडवळ, ता. चाकूर) यांनी ९ सप्टेंबर रोजी चाकूर पोलिस ठाण्यात फिर्याद असून बसचालक आनंद लक्ष्मण जोगपेटे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४९४/२०२६, कलम २८१, १२५ (ब) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















