देशात महागाईचा भडका उडाला असून अन्नपदार्थ, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित (डब्ल्यूपीआय) महागाईचा दर ऑगस्टमध्ये वाढून ९.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये हा दर ९.७८ टक्के तर किरकोळ महागाई दर ४.८२ टक्के नोंदवला गेला. २०२२-२३ हे आधार वर्ष असलेल्या नव्या डब्ल्यूपीआय मालिकेतील ऑगस्टमधील महागाईचा दर हा दुस-या क्रमांकाचा सर्वाधिक दर ठरला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने जागतिक ऊर्जा किमतीमध्ये अलिकडे झालेली वाढ यामुळे आगामी काळातही महागाईचा दबाव वाढत राहण्याची शक्यता आहे. उत्पादक किमतीवर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये ९.८१ टक्के राहिला, तर जुलैमध्ये तो ९.६ टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डब्ल्यूपीआयची आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, ऑगस्ट २०२६ मध्ये खनिज तेल (पेट्रोलियम उत्पादनांसह) खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ निर्मिती, मूलभूत धातूंचे उत्पादन, बिगर-अन्नपदार्थ आणि रसायने व रासायनिक उत्पादनांचे उत्पादन हे घाऊक महागाई वाढण्यामागील प्रमुख घटक ठरले. ऑगस्टमध्ये अन्न महागाईचा दर ७.०५ टक्क्यांवर पोहोचला. जुलैमध्ये तो ६.६५ टक्के होता. उत्पादित वस्तूंच्या गटातील डब्ल्यूपीआय महागाईचा दर मालिकेतील उच्चांकी पातळीवर म्हणजे ८.३७ टक्क्यांवर गेला. जुलैमध्ये हा दर ८.२९ टक्के होता.
इंधन आणि वीज गटातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये २२.९३ टक्के झाला. जुलैमध्ये हा दर २०.०५ टक्के होता. बार्कलेजच्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने जागतिक ऊर्जा किमतीमध्ये झालेली अलीकडील वाढ डब्ल्यूपीआय आणि ओपीपीआयवर पुढील काळातही दबाव कायम ठेवेल. त्यामुळे आगामी महागाईच्या आकडेवारीत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा धरता येणार नाही. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र पंत यांच्या मते पश्चिम आशियातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संकटामुळे इंधन आणि वीज महागाईतील दोन महिन्यांची घसरण थांबली असून, संकट सुटेपर्यंत हा दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील संकट अद्याप कायम असून, रशिया-युक्रेन संघर्षाप्रमाणेच या संकटाचेही निराकरण झालेले नाही. त्यामुळे नजिकच्या काळात जागतिक अनिश्चितता उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. त्यातच अपुरा पाऊस आणि रुपयाची कमजोरी यामुळे नजिकच्या काळात महागाई आणखी वाढू शकते. दुस-या एका अंदाजानुसार सप्टेंबर २०२६ मध्ये घाऊक महागाईचा दर १०.२ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पश्चिम आशिया संकटावर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत २०२६ च्या उर्वरित काळातही तो उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
आयसीआरएचे मुख्य अर्थतज्ज्ञ राहुल अग्रवाल म्हणाले की, प्रतिकूल आधार परिणाम तसेच साखरेसारख्या काही खाद्यपदार्थांच्या किमतीत नेहमीपेक्षा अधिक वाढ झाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अन्नमहागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या भावनांवरही परिणाम होऊ शकतो. अन्नधान्यांच्या वाढत्या दरांमुळे ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई वाढून ४.८२ टक्के झाली. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जुलैमध्ये ४.४५ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या किरकोळ महागाईचा निर्देशांक आकडेवारीनुसार, ऑगस्टमधील अन्नधान्य महागाईचा दर ५.९५ टक्क्यांवर पोहोचला. जो मागील महिन्यात ५.५२ टक्के होता. रिझर्व्ह बँकेने २०२६-२७ या वर्षासाठी सीपीआय महागाई ५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात दुस-या तिमाहीत ४.७ टक्के, तिस-या तिमाहीत ५.९ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.५ टक्के महागाईचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे अन्नधान्य, इंधन व उत्पादित वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर जुलैमधील ९.७८ टक्क्यांवरून वाढून ९.९२ टक्के झाला आहे. महागाईच्या भडक्यामुळे सर्वसामान्यांना किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही स्तरांवर महागाईचा दुहेरी तडाखा बसला आहे.
















