दक्षिण सोलापूर : आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा कु-हाडीने घाव घालून खून करण्यात आला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी सात वाजण्यापूर्वी घडली. सचिन अभिमान सासवे (वय २४) राहणार आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वळसंग पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
या खून प्रकरणी आरोपी धोंडीबा हनुमंत छेत्री (वय ४५) व त्याचा मुलगा आयुष धोंडीबा छेत्री (वय २०) दोघेही राहणार आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी धोंडीबा छेत्री याच्या पत्नीसोबत सचिन सासवे याचे अनैतिक संबंध असल्याचा राग त्याच्या मनात होता. सचिन सासवे हा काल रात्री आहेरवाडी-बंकलगी रस्त्यावरील आपल्या शेतात झोपला होता. तेव्हा दारूच्या नशेत रविवारी पहाटे झोपलेल्या वस्तीवर जाऊन हनुमंत छेत्री आणि त्याच्या मुलाने कु-हाडीने घाव घालून सचिन याचा खून केला. त्यानंतर खून करून हनुमंत छेत्री हे जवळच असलेल्या आपल्या शेतात जाऊन थांबला होता.
दरम्यान या खूनाच्या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजेंद्र टाकणे, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक रतिकांत कोळी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, एलसीबी टीम घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवून देण्यात आला. हनुमंत छेत्री आणि त्याच्या मुलाने हा खून केल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर शेतातील वस्तीवर थांबलेल्या हनुमंत छेत्री व त्याच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठवड्यातील ही दुसरी खुनाची घटना आहे. त्यामुळे वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. या खूनाच्या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास वळसंग पोलिस करीत आहेत.
















