कौसडी : जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणात केवळ ३ टक्के अर्थात एक महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणा-या पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले असून शेतक-यांची कृषीपंप बंद करण्यात आले आहेत. धरणात मृत पाणीसाठा असल्याने या धरणातून तहान भागणा-या गावांवर पाणीटंचाई संकट ओढावणार आहे. परिणामी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
यावर्षी अलनिनोच्या संकटामुळे अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. करपरा येथील धरणातही सद्यस्थितीत केवळ ३ टक्के पाणीसाठा असून तो देखील मृत पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा केवळ एक महिना पुरेल एवढा आहे. या धरणावर कौसडी, कुपटा, बोरी गावाला पाणीपुरवठा करणा-या योजना अवलंबून आहेत. त्यामुळे धरणावर अवलंबून असणा-या सर्व गावांतील नागरिकांना पुढील काळात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे. यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतक-यांचे कृषी पंप प्रशासनाने बंद केले आहेत. त्यामुळे शेतक-यांपुढे सिंचनाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गावात पाणी नसल्यामुळे पाणीटाचाईचे भीषण संकट निर्माण होणार आहे. करपरा धरणावर बोरी, कौसडी गावच्या जलजीवन योजना कार्यरत आहेत. मात्र धरणातील ३ टक्के पाणीसाठ्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. यासाठी शासनाने आताच टँकर, विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
करपरा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने या ठिकाणी खोलीकरण, गाळ काढण्यासाठी योग्य वेळ आहे. १९७२ साली या धरणाची निर्मिती झाली तेंव्हापासून या धरणाचे खोलीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे धरणाची पाणीसाठवण क्षमता कमी झाली असून प्रशासनाने खोलीकरणाचे काम हाती घेतल्यास धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढून नागरिकांचा पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.
















