बोरी : बोरी येथून परभणीकडे जाणा-या बाबाराव गोपाळराव सावळे (वय ३०) यांच्या दुचाकीसमोर अचानक रानडुक्कर आडवे आले. या रानडुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात सावळे जखमी झाले आहेत.
बोरी येथील रहिवासी असलेले सावळे दुचाकीवरून (क्रमांक एमएच २२ बीजे ७४२७) बोरीहून परभणीकडे जात होते. बोरी शिवारात अचानक शेतातून धावत आलेले रानडुक्कर रस्त्यावर आडवे आले. रानडुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी घसरून रस्त्यावर पडले. या अपघातात सावळे यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उपचारासाठी बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय परभणीत दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बोरी-परभणी महामार्गावर रानडुकरांचा वावर वाढल्याने वाहनधारकांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. रानडुकरे रस्त्यावर येणार नाहीत यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
















