मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचा-यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील लाखो प्रवाशांना दररोज परिवहन सेवा पुरवली जाते. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रवाशांची वाहतूक करण्याची महत्त्वाची जबाबदारी एसटी कर्मचारी पार पाडतात. चालक, वाहक तसेच विविध विभागांतील कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या काळात कर्मचा-यांना आर्थिक मदत मिळावी, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने मांडली आहे.
वाढती महागाई आणि इतर आस्थापनांमधील कर्मचा-यांना जाहीर करण्यात आलेल्या दिवाळी भेटीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचा-यांना यंदा दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना देण्यात आले.
दरवर्षी दिवाळीनिमित्त आर्थिक स्वरूपात भेट
मंत्री प्रताप सरनाईक हे मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आले असताना संघटनेच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. एसटी कर्मचा-यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त आर्थिक स्वरूपात भेट दिली जाते. मात्र, यंदा वाढलेली महागाई लक्षात घेता कर्मचा-यांना दिल्या जाणा-या दिवाळी भेटीच्या रकमेत वाढ करणे आवश्यक आहे. राज्यातील इतर आस्थापनांमधील कर्मचा-यांना जाहीर करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांनाही सन्मानजनक रक्कम मिळावी, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.
















