चंद्रपूर : प्रतिनिधी
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. विनापरवानगी पायदळ मार्च काढल्याप्रकरणी आणि प्रक्षोभक वक्तव्यांचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची देखील धमकी दिली होती. या प्रकरणी आता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपुरातील स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये (कोळसा खाणीतील) ८० टक्के नोक-यांमध्ये प्राधान्य देण्यासह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात आला होता. विनापरवानगी पायदळ मार्च काढणे, बेकायदेशीर जमाव जमविणे तसेच भाषणातून पोलिसांना शिवीगाळ आणि तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी दिल्याच्या आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. बच्चू कडू यांच्यासह ६ जणांविरोधात घुग्घूस पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या सर्वांविरोधात बीएनएस २०२३ मधील कलम १९०, १९१(२) २९६, २२३, २२४, ३५१ (२) तसंच महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार बच्चू कडू यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक मुकेश जिवतोडे, रोशन राजाराम हरबडे, अमोल नथ्थूजी मांढरे, नथ्थू भाऊराव नवले आणि सतीश बीडकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिस नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलिसांवर खालच्या पातळीवर टीका केली होती.
यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा पुलावरून त्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाची घुग्गुस शहरातील कारगिल चौकात सांगता झाली. जवळपास १५ किलोमीटरचा पायी प्रवास करत बच्चू कडू यांनी हा मोर्चा पूर्ण केला. या मोर्चानंतर सांगता सभा झाली तेव्हा त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांवर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती.
















