देवणी: बाळू तिपराळे
दुष्काळाने आधीच आर्थिक कंबरडे मोडले असताना शासनाकडून जाहीर झालेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीसाठीही शेतक-यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. देवणी तालुक्यातील शेतकरी बँकांसमोर तासन्तास रांगेत उभे राहून आपल्या हक्काची मदत मिळविण्यासाठी धडपडत आहेत.
देवणी तालुक्यात एकूण ४२ हजार १९४ शेतकरी आहेत. यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे अडचणीत आला असून, शेतक-यांच्या हाताला अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत शेतक-यांसाठी मोठा आधार ठरण्याची अपेक्षा होती. मात्र, बँकांमधून ही रक्कम काढताना शेतक-यांना प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे.
काही शेतक-यांना पाच तासांपर्यंत बँकेच्या रांगेत थांबावे लागत आहे. दिवसभर रांगेत उभे राहूनही काहींना त्याच दिवशी पैसे मिळतात, तर काहींना दुस-या दिवशी येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी पैसे उचलायचे की बँकेच्या रांगेतच दिवस घालवायचा, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे हाताला काम नाही आणि आता मदतीच्या रकमेसाठी बँकांसमोर प्रतीक्षा, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. दिवाळी आनंदात साजरी करण्याची इच्छा असतानाही आर्थिक विवंचनेमुळे शेतक-यांचा सण यंदा चिंतेच्या सावटाखाली जाण्याची शक्यता आहे.
















