मुंबई : प्रतिनिधी
पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि झाडांच्या संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे आता कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. कर्जतमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीची ते पाहणी करत आहे.
कर्जतमध्ये सुरू असलेल्या या वृक्षतोडीच्या निषेधार्थ परिसरातील काही तरुण गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहे.
सयाजी शिंदे यांनी थेट उपोषणस्थळी जाऊन या तरुणांची भेट घेतली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सयाजी शिंदे यांनी आपल्या मिश्किल शैलीत सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आपण जसं घरात एखादं संकट टळावं म्हणून देवाला पाण्यात ठेवतो, तसं आता आपल्या मुख्यमंर्त्यांनाच आपण पाण्यात ठेवूया! आणि त्यांना सांगूया की, हे जे जंगलावर आणि पर्यावरणावर संकट आलंय, त्यातून तुम्हीच आम्हाला वाचवा.
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतानाच, त्यांनी या तरुणांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या तरुणांशी बोलताना त्यांनी दिलेला लढा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
हे जंगल तोडू द्यायचे नाही, हीच भूमिका
वृक्षतोडीच्या भीषण वास्तवावर भाष्य करताना सयाजी शिंदे म्हणाले, आज आम्ही या संपूर्ण वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी इथे आलो आहोत. इथे मोठ्या प्रमाणावर निसर्गाची हानी होत आहे. पण, हे जंगल अजिबात तोडू द्यायचे नाही, हीच आमची सर्वांची ठाम भूमिका आहे. या संपूर्ण प्रकरणावर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
















