नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचे लवकरच प्रकाशन होणार आहे, या पार्श्वभूमीवर एका वृत्तापत्राला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले. तसेच मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतल्या कारभारावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या काळात भारताची धर्मनिरपेक्षतेची वीण उसवली आहे. मोदी सरकार गेल्यानंतरही ती पुन्हा दुरुस्त करायला वेळ लागेल अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली.
सोनिया गांधी म्हणाल्या, लोक आता अस्वस्थ होऊ लागले आहेत आणि त्यांना नुकसानाची जाणीव होऊ लागली आहे. परंतु, मी आशावादी आहे आणि मला खात्री आहे की, भारतातील जनता पुन्हा एकदा सुशासनाकडे परतण्याचे स्वागत करेल. गेल्या बारा वर्षांत आपल्या देशाच्या जडणघडणीचे, आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही, आपल्या व्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी बराच वेळ लागेल आणि त्यासाठी राजकीय पक्षांना खूप प्रयत्न करावे लागतील, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसची घसरण आणि सरकारवर केलेले ‘मतचोरी’चे आरोप यांविषयी सोनिया गांधी म्हणाल्या, मी इतकी निराशावादी नाही. हे लक्षात घ्या की, हे सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस पक्षाला आणि इतर विरोधी पक्षांना समान संधी मिळालेली नाही. सर्व संस्थांवर विशेषत: निवडणूक आयोगावर त्यांचे असलेले पूर्ण नियंत्रण, मुख्य प्रवाहातील माध्यमांवरील त्यांची पकड, त्यांची आर्थिक ताकद आणि धर्माचा त्यांनी केलेला गैरवापर, या सर्व गोष्टी लक्षात घ्या. तरीही, आमचा पक्ष संघर्ष करत आहे आणि प्रगतीही करत आहे. किंबहुना, या आक्रमणाचा सामना करण्याची क्षमता असलेला हा एकमेव पक्ष आहे, असेही गांधी यावेळी म्हणाल्या.
सरकारच्या विरोधकांप्रती असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य करताना सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते सर्व प्रकारच्या छळाला सामोरे गेले आहेत, असे असूनही, प्रत्येक गावात आणि प्रत्येक जिल्ह्यात, काँग्रेसचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या मूल्यांसाठी अजूनही लढा देत आहेत. इतकंच नव्हे, तर अलिकडच्या काही महिन्यांत अनेक निवडणुका चोरल्या गेल्या हे स्पष्ट झाले आहे आणि आता लोक त्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. काँग्रेस समान विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत मिळून काम करत आहे आणि आमची स्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे,
पंतप्रधान मोदींकडून काही शिकण्यासारखे आहे का? यावर सोनिया गांधी म्हणाल्या, हे खरं आहे की त्यांची वैचारिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. परंतु, काँग्रेस पक्षातही लोक अनेक मार्गांनी यशस्वी होतात. उदाहरणार्थ, डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे. मला नाही वाटत की आपल्याला फार काही शिकण्यासारखे आहे
२००४ मध्ये जर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारलं असतं, तर यूपीएची धोरणं आणि काँग्रेसची रणनीती वेगळी असती का? असा प्रश्न विचारला असता, सोनिया गांधी म्हणाल्या, नाही, अजिबात नाही. असा विचार माझ्या मनात कधीही आला नाही. आमचा अनुभव एकंदरीत खूप सकारात्मक होता. आम्ही एक टीम म्हणून काम केलं आणि आमची भूमिका स्पष्ट होती. डॉ. सिंग सरकारचे नेतृत्व करत होते, तर मी पक्षाचे नेतृत्व करत होते.
















