लेह : लडाखमधील तरुणांचा आवाज उठवल्यामुळे आणि लडाखसह अरुणाचल प्रदेशसारख्या सीमावर्ती भागांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडल्यामुळे प्रशासन सूडबुद्धीने कारवाई करत आहे. आपल्या शिक्षण संस्थांना त्रास दिला जात आहे, असे गंभीर आरोप प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि लेह अॅपेक्स बॉडीचे प्रमुख सदस्य सोनम वांगचुक यांनी केले आहेत. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून लडाख पूर्णपणे पोलिस स्टेट बनले असून स्थानिकांचे लोकशाही अधिकार हिरावून घेतले गेल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे.
प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवताना वांगचुक यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. लडाखमध्ये सोशल मीडियावर एखादी छोटी टिप्पणी केल्यास किंवा पोस्ट फक्त लाईक केल्यासही नागरिकांवर थेट एफआयआर दाखल करून त्यांना अटक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, १४ ऑक्टोबर रोजी लडाख लेन्स १ आणि लडाख व्हिजन १ नावाचे दोन सोशल मीडिया पेज तयार करण्यात आल्याचे वांगचुक यांनी सांगितले. यातील पहिल्या पेजचा वापर आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी व बिनबुडाचे आरोप करण्यासाठी केला जात आहे; तर दुसरे पेज नायब राज्यपाल प्रशासनाच्या कामांची खोटी प्रसिद्धी करण्यासाठी वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
















