जेरुसलेम : इराणबरोबर युद्धावेळी देशाला तारणारा नेता, असे बिरुद मिरवणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सत्तेत टिकून राहण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी माजी लष्करप्रमुख आणि यशार पक्षाचे नेते गादी आयसेनकोट यांना देशाचे पुढील सरकार स्थापन करण्याची जबाबदारी दिली आहे. आता इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी आयसेनकोट यांच्या रणनीतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
इस्रायलमध्ये नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. १२० सदस्यांच्या संसदेत (नेसेट) अससणा-या विविध राजकीय पक्षांशी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी आता माजी लष्करप्रमुख आणि ‘यशार’ पक्षाचे नेते गादी आयसेनकोट यांना देशाचे पुढील सरकार स्थापन करण्याची जबाबदारी दिली आहे. ६७ आमदारांचा पाठिंबा असलेले आयसेनकोट यांच्याकडे आता युती सरकार स्थापन करण्यासाठी २८ दिवसांचा कालावधी आहे.
आयसेनकोट यांना मिळणार सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण
आता आयसेनकोट यांना युती सरकार स्थापन करण्याची पहिली संधी मिळाली असून स्थानिक वेळेनुसार जेरुसलेममधील राष्ट्राध्यक्ष भवनात आयोजित समारंभात त्यांना सरकार स्थापनेचे अधिकृत निमंत्रण (मँडेट) दिले जाईल. निर्णय घेण्यापूर्वी हर्झोग यांनी नेतन्याहू आणि आयसेनकोट या दोघांशीही चर्चा केली होती आणि आपण आयसेनकोट यांची निवड करणार असल्याचे त्यांना कळवले होते.
नेतन्याहू यांना केवळ ४६ आमदारांचा पाठिंबा
इस्रायलच्या १२० सदस्यांच्या संसदेत (नेसेट) ६७ खासदारांनी आयसेनकोट यांच्या नावाची शिफारस केली आहे. तर नेतन्याहू यांना केवळ ४६ आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. सात खासदारांनी तटस्थ राहणार असल्याचे स्पष्ट केले.
कोण आहेत आयसेनकोट?
आयसेनकोट हे इस्रायल संरक्षण दलाचे माजी प्रमुख आहेत. २०२२ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले. त्याचबरोबर मध्य-डाव्या विचारसरणीच्या पक्षांपासून ते उजव्या विचारसरणीच्या पक्षांपर्यंत सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर, आयसेनकोट काही काळ नेतान्याहू यांच्या युद्धकालीन मंत्रिमंडळात सहभागी होते, परंतु नंतर ते पुन्हा विरोधी पक्षात परतले. तेव्हापासून, युद्ध कसे हाताळले गेले यावरून ते नेतान्याहूंच्या सर्वात प्रखर टीकाकारांपैकी एक बनले आहेत. नेतान्याहूंच्या नेतृत्वाखालील कोणत्याही सरकारमध्ये काम करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. ते सत्ता स्थापनेत यशस्वी झाले, तर ते इस्रायलचे पहिले मिझराही (मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतून आलेल्या समुदायातील) पंतप्रधान ठरतील.
नूतन सरकारला कोणत्या पक्षांचा पाठिंबा?
आयसेनकोट यांना ६७ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये चेंज ब्लॉककडून ४८, अरब पक्ष राआम कडून ७ आणि जॉइंट लिस्टच्या १२ खासदारांचा समावेश आहे. नेतन्याहू यांना त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या आणि धार्मिक मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाला. युनायटेड तोराह ज्युदाइझम पक्षाच्या सात सदस्यांनी या प्रक्रियेत तटस्थ राहणे पसंत केले आहे. आता इस्रायलच्या राजकारणात नेतन्याहूचा प्रभाव कायम असला तरी त्यांच्या नेतृत्वाखाली राहण्यापेक्षा आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखाली एक पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी खासदार अधिक इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
















