मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल तपासणीदरम्यान वगळण्यात आलेल्या अंदाजे २.१ कोटी नावांपैकी फक्त १६.८ टक्के नावे मतदाराच्या मृत्यूमुळे वगळण्यात आली. उर्वरित ८३ टक्के नावे कायमस्वरूपी स्थलांतर, ठिकाणाचा शोध न लागणे, घरी नसणे किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असणे यांसारख्या इतर कारणांमुळे वगळण्यात आली. अहवालानुसार, फक्त मुंबई उपनगरात जवळपास प्रत्येक ३ मतदारांपैकी एकाचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले.
साबर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, ठाण्यात २८.६ लाख नावे वगळण्यात आली, जे शहरातील विद्यमान मतदारांच्या ३८.४ टक्के आहे. त्यानंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो, जिथे २५.६ लाख विद्यमान मतदारांपैकी ९,५०,००० नावे यादीतून वगळण्यात आली, जे ३७.२ टक्के आहे. मुंबई उपनगरांमध्ये ७८.३ लाख मतदारांपैकी २६.६ लाख नावे वगळण्यात आली, जे एकूण मतदारांच्या ३३.९ टक्के आहे.
अहवालानुसार, महाराष्ट्रातील एकूण वगळलेल्या नावांपैकी १७ टक्के नावे मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघांमधून वगळण्यात आली, तर एसआयआर लागू होण्यापूर्वी या भागांचा राज्याच्या एकूण मतदारसंख्येत केवळ ११ टक्के वाटा होता. या विधानसभा मतदारसंघांमधील नाव वगळण्याचा दर ३४.७ टक्के होता, तर राज्याच्या उर्वरित भागात हा सरासरी दर १९.५ टक्के होता.
मृत्यूशिवाय इतर कारणांमुळे नावे वगळण्याच्या बाबतीत ठाणे जिल्हा ३५.४ टक्क्यांसह राज्यात आघाडीवर आहे. मुंबई शहरात हे प्रमाण ३१.६ टक्के आणि मुंबई उपनगरात २९.७ टक्के नोंदवले गेले, ज्यामुळे या बाबतीत ते अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत. मृत्यूशिवाय इतर कारणांमुळे वगळण्यात आलेल्या एकूण मतदारांपैकी पुणे, नागपूर आणि पालघरमध्ये अनुक्रमे २८.१ टक्के, २५.९ टक्के आणि २५.१ टक्के मतदारांची नोंद झाली.
अहवालानुसार, महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा जागांपैकी १९० जागा अशा होत्या, जिथे मृत्यूव्यतिरिक्त इतर कारणांमुळे वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती. याशिवाय, ९५ विधानसभा मतदारसंघांमध्ये जे मतदार सापडत नव्हते किंवा अनुपस्थित होते, त्यांची नावे वगळण्यात आली. या अभ्यासात असेही आढळून आले की, नावे वगळण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी जिल्ह्याच्या वांशिक किंवा धार्मिक रचनेपेक्षा शहरीकरण हा अधिक महत्त्वाचा घटक आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघात, मतदार यादीतून अंदाजे १,२०,००० नावे वगळण्यात आली, जे विद्यमान मतदारांच्या ४६.९ टक्के आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांमध्ये हे दुसरे सर्वाधिक प्रमाण आहे. अभ्यासानुसार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतून वगळलेल्या नावांची संख्या एकूण मतदानाच्या संख्येपेक्षा जास्त आहे, असा कुलाबा हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १,१८,४९९ मते पडली होती. महिला आणि पुरुषांमधील नावे वगळण्याच्या दरात फारसा फरक नव्हता. अभ्यासानुसार, हा दर महिलांसाठी २१.४ टक्के आणि पुरुषांसाठी २१.२ टक्के होता. तथापि, मुंबईबाहेर कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्यांमध्ये, १८ ते २९ वयोगटातील महिलांची संख्या पुरुषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होती. या गटात ३,८०,००० पुरुषांच्या तुलनेत ८,२०,००० महिलांची नावे वगळण्यात आली. इतकेच नव्हे तर, ५३ टक्क्यांपेक्षा जास्त तृतीयपंथी मतदार म्हणजेच ३,२५० हून अधिक यांनाही २०२४ च्या मतदार यादीतून वगळण्यात आले.
















