लातूर : प्रतिनिधी
६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पधेच्या लातूर केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाले. उद्घाटनानंतर उन्नती फाउंडेशन लातूर या संस्थेने डॉ समीर मोने लिखित आणि सुवर्णा बुरांडे दिग्दर्शित ‘लाडू’ हे कौटुंबिक पातळीवरील मनोव्यवहाराचे रेखाटन करणारे नाटक अप्रतिम रित्या सादर केले.
विधवा आई, लग्नाचं वय उलटून गेलेली तिची मुलगी यांच्या मनातील द्वंद्व या नाटकातून मनोविश्लेषणात्मक पातळीवर लेखकाने अधोरेखित केले आहे. एकीकडे माया, ममता, वात्सल्य आणि दुस-या टोकाला कमालीचा विखार, दुजाभाव आणि यातून उद्भवणारा मायलेकीचा जगावेगळा संघर्ष. भ्रमाच्या भोव-यात अडकलेले आयुष्य आणि या भासमान पडद्याआड दबा धरून बसलेले भीषण वास्तव. भूत आणि वर्तमानाच्या हिंदोळ्यावर झुलत मानवी मनाच्या अथांग डोहाचा तळ शोधू पाहणारी ही भावस्पर्श कथा. दिग्दर्शिका सुवर्णा बुरांडे यांनी या कथानाकाचा पोत लक्षात घेऊन सूक्ष्म बारकावे शोधत या नाटकाला खूप अभ्यासपूर्ण आकार दिला आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी केलेली यशस्वी घोडदौड कौतुकास्पद आहे. याच नाटकातील आईची मुख्य भूमिका त्यांनी समर्थपणे उभी केली आहे.
मंजुषा पाठक यांनी अंजू ही खूप वैविध्यपूर्ण आयाम असलेली लेकीची भूमिका अगदी समरसून केली आहे. तेजश्री पाटील यांची शांता खूप भाव खाऊन गेली. गुलाब झालेल्या नम्रता पाठक यांनी आपल्या अभिनयाने नाट्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. गणेश मरोड यांची प्रकाश योजना ही तर नाटकाचा आत्मा म्हणावा इतकी अर्थपूर्ण आणि कलात्मक झाली. रवी आघाव आणि सलीम पठाण यांचे नेपथ्य खूप विचारपूर्वक केलेले होते. ऋतुराज सुरवसे यांनी आपल्या पार्श्वसंगीतच्या माध्यमातून नाटकाला उंचीवर नेण्याचे महत्त्वाचे काम केले. रुक्मिणी मुंडे आणि आशा गोडभरले यांनी वेशभूषा उत्तमपणे सांभाळली. दिवाळीत भरपेट लाडू खाऊनही दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारा हा ‘लाडू ‘ मात्र लातूरच्या नाट्यरसिकांना अधिक लज्जतदार वाटला.
















