ढाका : सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान चुकून आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून बांगलादेशात गेल्याने त्याला बांगलादेशच्या सीमा रक्षक दलाने (बीजीबी) ताब्यात घेतले. मंगळवारी ही घटना घडली. यानंतर दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये ध्वज बैठक झाली. या बैठकीनंतर जवानाची सुटका करण्यात आली. त्याला भारतात परत आणल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
मेघालय क्षेत्रातील बीएसएफच्या वरिष्ठ अधिका-यांनी जवानाची सुटका करण्यासाठी बांगलादेशच्या सीमा रक्षक दलाच्या अधिका-यांकडे ध्वज बैठकीची मागणी केली होती. संबंधित जवान चुकून बांगलादेशातील सिल्हेट येथील बिछनाकांडी सीमाभागात गेला होता. या ठिकाणी सीमारेषेवर कुंपण नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती अधिका-यांनी दिली. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक नागरिकांनी जवानाला पकडून बीजीबीच्या जवानांच्या ताब्यात दिले. या वेळी स्थानिक नागरिकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच त्याला सोडण्यासही त्यांनी नकार दिला होता, अशी माहिती या घटनेची माहिती असलेल्या व्यक्तींनी दिली.
दरम्यान, बीजीबीचे जवान एका मोटारसायकलवरून संबंधित जवानाला घेऊन जात असल्याचे काही व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हीडीओंमध्ये बांगलादेशी ग्रामस्थांनी जवानाला घेरल्याचेही दिसत आहे. मात्र, हे व्हीडीओ खरे आहेत की नाहीत, याची स्वतंत्रपणे पुष्टी करता आलेली नाही. मेघालयची बांगलादेशसोबत सुमारे ४४३ किलोमीटर लांबीची सीमा आहे. त्यापैकी जवळपास ४० किलोमीटरच्या सीमाभागात अद्याप कुंपण उभारण्यात आलेले नाही.
















