नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या गगनयानच्या पहिल्या मानवरहित उड्डाणाची (जी-१) तयारी अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी भास्करला सांगितले की, गगनयान डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी २०२७ च्या सुरुवातीला प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू आहे.
त्यांनी सांगितले की, श्रीहरिकोटाच्या दुस-या प्रक्षेपण पॅडवरून होणा-या या उड्डाणात क्रू आणि सर्व्हिस मॉड्यूल अंतराळात पाठवले जातील. क्रू मॉड्यूल सुरक्षितपणे परत आणण्याची चाचणी करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात ुमनॉइड रोबोट व्योममित्रला पाठवले जाणार नाही; त्याला दुस-या उड्डाणात पाठवले जाईल. पहिली दोन उड्डाणे यशस्वी ठरल्यास, तिस-या उड्डाणात मार्च २०२८ पर्यंत भारतीय गगनयात्री अंतराळात जातील. ही मोहीम पूर्ण होताच अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात मानव पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल.
केवळ एक-दोन चाचण्या बाकी
ही मोहीम मानववाहू एचएलएमवी-३ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल. हे चांद्रयान-३ मध्ये वापरलेल्या रॉकेटचेच अद्ययावत रूप आहे. सध्या संपूर्ण मॉड्यूलची थर्मो-वॅक चाचणी सुरू आहे. यात अंतराळातील निर्वात परिस्थितीत उपकरणांची तपासणी केली जात आहे. इस्रोने गगनयान कार्यक्रमातील क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल वेगळे करणा-या प्रणालीची चाचणी पूर्ण केली आहे. यानंतर या प्रणालीच्या डिझाइन क्षमतेची पुष्टी झाली आहे. याच वर्षी १६ ऑक्टोबर रोजी हे परीक्षण तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे करण्यात आले होते.
















