कुलग्राम : जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी कमांडर लतीफ भट ठार झाला, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
लतीफ भट आणि आणखी एक दहशतवादी उमर निसार दार हे दोघेही ११ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. या हल्ल्यात निमलष्करी दलाचे तीन जवान जखमी झाले होते. दक्षिण कश्मीरमधील या जिल्ह्यातील लारू बायपास परिसरात सोमवारी झालेल्या चकमकीत उमर निसार दार ठार झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी ही चकमक झाली.
सोमवारी झालेल्या चकमकीच्या ठिकाणाहून लतीफ भट पळून जाण्यात यशस्वी झाला होता. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील देवसर भागातील झंगलपोरा गावात घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. हे ठिकाण सोमवारी चकमक झालेल्या ठिकाणापासून दूर आहे.
















