नवी दिल्ली : भारतीय लष्कराने वरिष्ठ अधिका-यांच्या पोशाखात २०२३ मध्ये केलेले बदल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश १ डिसेंबरपासून लागू होईल. १३ नोव्हेंबरच्या पत्रावर आधारित अंतर्गत आदेशानुसार, गोरखा रायफल्सचे जनरल पुन्हा त्यांच्या ओळखीची टोपी घालू शकतील. स्पेशल फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी मरून बेरेट, तर बख्तरबंद रेजिमेंटचे अधिकारी काळी बेरेट घालू शकतील.
वरिष्ठ अधिकारी अधिकृत गणवेशासोबत त्यांच्या पारंपरिक रेजिमेंट किंवा कोरशी संबंधित चिन्हेही लावू शकतील. हा बदल ब्रिगेडियर आणि त्यावरील अधिका-यांना लागू होईल. २०२३ मध्ये लष्कराने वरिष्ठ नेतृत्वासाठी एकसमान ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने गणवेशातील अनेक वस्तू एकसारख्या केल्या होत्या. त्या धोरणानुसार अधिका-यांच्या मूळ रेजिमेंट आणि सेवेची ओळख दर्शवणारी चिन्हे काढून टाकण्यात आली होती.
नुकताच कमांडोंचा गणवेश बदलला
ब्लॅक कॅट कमांडोंचा प्रसिद्ध काळा गणवेश आता बदलण्यात येणार आहे. यामागचे कारण आहे. प्रचंड उष्णता. नॅशनल सिक्युरिटी गार्डने आपल्या व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेत तैनात कमांडोंसाठी नवीन हवेशीर म्हणजेच श्वास घेता येणारा गणवेश तयार करण्याची शिफारस केली आहे. हा गणवेश नायको कापडापासून तयार केला जाईल, ज्यामध्ये नायलॉन आणि कॉटन असते. हे कापड हवा आणि ओलावा सहजपणे बाहेर जाऊ देते.
एक कमांडो ४४ अंश तापमानात बेशुद्ध
एप्रिलमध्ये विजयवाड्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक कमांडो ४४ अंश तापमानात बेशुद्ध झाला होता. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होईपर्यंत कमांडो नवीन गणवेश परिधान करू लागतील, अशी एनएसजीला अपेक्षा आहे.
















