भोपाळ : बर्ड फ्ल्यूच्या धोकादायक एच५एन१ विषाणूपासून कोंबड्या आणि पोल्ट्री उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी भोपाळच्या शास्त्रज्ञांनी देशातील पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने ही लस विषाणूच्या क्लेड २.३.२.१ विरुद्ध तयार केली आहे. तिच्या एका डोसद्वारे कोंबड्यांना सहा महिन्यांपर्यंत संरक्षण मिळेल. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान २० नोव्हेंबर रोजी भोपाळमधील संस्थेच्या परिसरात ही लस लॉन्च करतील. ही निष्क्रिय लस आहे. तिच्या चाचण्यांमध्ये अंडी देणा-या आणि प्रजननासाठी पाळल्या जाणा-या कोंबड्यांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. तिचा वापर मुख्यत: पोल्ट्री फार्ममधील लेअर आणि ब्रीडर कोंबड्यांच्या लसीकरणासाठी केला जाईल.
आतापर्यंत भारतात या विषाणूच्या स्ट्रेनविरुद्ध व्यावसायिक वापरासाठी स्वदेशी लस उपलब्ध नव्हती. एच५एन१ विषाणू कोंबड्यांसाठी अत्यंत घातक आहे. त्याच्या संसर्गामुळे एखाद्या पोल्ट्री फार्ममधील जवळपास १००% कोंबड्यांचा मृत्यू होऊ शकतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर संसर्ग रोखण्यासाठी प्रभावित भागात मोठ्या संख्येने कोंबड्या माराव्या लागतात. यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. भारतात २००६ मध्ये पहिल्यांदा बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव समोर आला होता. त्यानंतर देशात ५०० हून अधिक वेळा संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सुरुवातीच्या प्रादुर्भावादरम्यानच पोल्ट्री उद्योगाला सुमारे २,२०० ते ३,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
अंडी देणा-या कोंबड्यांना अधिक फायदा
या लसीचा सर्वाधिक फायदा लेयर्स आणि ब्रीडर्स कोंबड्यांना होईल. लेयर्सचा वापर अंडी उत्पादनासाठी, तर ब्रीडर्सचा वापर प्रजननासाठी केला जातो. त्यांचे आयुष्य ब्रॉयलर कोंबड्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ संसर्गापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. सहा महिन्यांपर्यंत संरक्षण मिळाल्यामुळे वारंवार लसीकरण करण्याची गरजही कमी होईल.
मानवांमध्ये संसर्गाचा धोका कमी होईल
एच५एन१ विषाणू मानवांनाही संक्रमित करू शकतो. संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने माणसांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका असतो. यामुळे तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास आणि गंभीर न्यूमोनिया होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, २००३ पासून आतापर्यंत जगभरात मानवांमध्ये एच५एन१ संसर्गाची १,००३ प्रकरणे आढळली आहेत. यापैकी ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोंबड्यांमधील संसर्ग रोखल्याने विषाणूचा प्रसार होण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, यासाठी नियमित देखरेख, शेतांमध्ये जैवसुरक्षा आणि संक्रमित पक्ष्यांपासून दूर राहणेही आवश्यक असेल.
















