अकोला : प्रतिनिधी
अशोक खरातसारख्या भोंदूबाबाचे प्रकरण समोर आल्यानंतरही राज्यातील काळी जादू आणि भोंदू बाबांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आता अकोल्यातील पैशांचा पाऊस पाडण्यातून अघोरी पूजा करत एका तरुणाचा नरबळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. घरातून २ दिवसांसाठी बाहेर गेलेल्या आपल्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचा गंभीर आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून हेमंत प्रफुल्ल सपकाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या मांत्रिकाचे यापूर्वीचे अघोरी पूजेचे काही व्हीडिओ देखील समोर आले आहेत.
विकी नामक मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यावरून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी हेमंत सपकाळ याचा पैशासाठी नरबळी केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. आपल्या दोन मित्रांसोबत तो अकोल्याच्या राहत्या घरून मध्य प्रदेशमधील इंदूर येथे जाण्यासाठी निघाला होता. तिथेच पैशाचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेदरम्यान हेमंतचा नरबळी दिला, असा खळबळजनक आरोप सपकाळ कुटुंबीयांनी केला. आपल्या लेकाच्या मृत्यूनंतर आईने आाक्रोश करत टाहो फोडल्याचे दिसून आले.
मृत हेमंतच्या भावाने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली. माझा भाऊ हेमंत प्रफुल्ल सपकाळ हा १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान विवेक उर्फ विक्की शिंदे ९३०७८१५०४६ आणि अजय गायकवाड व आणखी एक व्यक्ती तिघेही राहणार मोठी उमरी अकोला यांच्या सोबत अमरावतीला जात आहे, असे सांगून घरून गेला. त्यांनतर त्याच्याशी रोज बोलणे सुरू होते. १५ नोव्हेंबर रोजी बोलणे झाले तेव्हा माझा जीव धोक्यात आहे, असे म्हटले. त्यावेळी तो इंदूरला होता. मला काही लोकांनी आणले. मला वाचवा, असेही तो म्हणाला. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद पडला आणि १६ नोव्हेंबरला फोन आला आणि हेमंत मृत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
















