अकोला : प्रतिनिधी
एकीकडे दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच कर्जवसुलीसाठी बँका, फायनान्स कंपन्या तगादा लावत आहेत. त्यामुळे फायनान्स कंपन्यांनाही सरकारने सक्तीने वसुली न करण्याचा इशारा दिला. मात्र, अकोल्यात बँकेच्या वसुली एजंटने चक्क रुग्णालयातून जाऊन महिलेकडे वसुलीसाठी तगादा लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जवसुलीचा तगादा किती टोकाला जाऊ शकतो, याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये समोर आला.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला एका खासगी बँकेच्या वसुली कर्मचा-याने सोडले नाही. वैशाली गोपाल इंगळे या महिला रुग्णालयात उपचार घेत असतानाच हा कर्मचारी थेट तिच्याजवळ पोहोचला आणि कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावू लागला. या प्रकाराची माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या पदाधिका-याने संबंधित वसुली कर्मचा-याला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर तो एजंट निघून गेला. रुग्णालयात उपचार घेणा-या महिलेलाही कर्जवसुलीच्या तगाद्यातून सूट नाही का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
एकीकडे सरकार, मुख्यमंत्री, मंत्री घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळते आहे. अकोल्यातली या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला असून, कर्जवसुलीच्या या पद्धतीवर संताप व्यक्त केला जातोय. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीवर चाप लावू अशी वल्गना करणा-या सरकारचा या कंपन्यांना खरंच धाक आहे का? सरकारला हे एजंट घाबरत नाहीत का, असे प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.
















