जळगाव : खान्देशातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या पूज्य सानेगुरुजी यांची कर्मभूमी अमळनेर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनासांठी खान्देशसह राज्यातील सर्वच साहित्यीक व साहित्यप्रेमींना उत्सुकता आहे. त्यामुळे संमेलनात नोंदणी करण्यासाठी अनेकांनी सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, साहित्य संमेलनातील निवासासह भोजनाच्या अवाजवी शुल्कावर नाराजी व्यक्त होत आहे. अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे.
संमेलनात सहभागी होण्यासाठी तीन दिवसांचा निवास व भोजनाचा ८ हजार रुपये प्रतिव्यक्ती हे शुल्क अवाजवी असल्याने खान्देशातील अनेक साहित्यीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनात केवळ सहभागी होवून उपस्थिती देण्यासाठी कुठलेही शुल्क नसले तरी निवास व भोजनाची व्यवस्थ घेतल्यास ती दिवसांसाठी ८ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे हे शुल्क अवाजवी असल्याचा आरोप करीत खान्देशातीलच अनेक साहित्यीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार परिसरातील रसिकांसाठी ही रक्कम जास्त आहे. संमेलनाला शासनाचा २ कोटी रुपये निधीसह देणग्या जमा होत असताना आयोजक रसिकांवर अधिक रकमेचा भुर्दंड टाकत असल्याबद्दलही टीका होत असून हे शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात आहे.