अमरावती : रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून विदर्भ पीठावर निनावी पत्राद्वारे राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या पत्रामध्ये तुम्ही जे अयोध्या-अयोध्या करत आहात ते महागात पडेल, आज नाही तर उद्या तुमचा अंत निश्चित आहे, अशी धमकी पत्राद्वारे महाराजांना देण्यात आली आहे.
जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष निमंत्रण आले आहे. त्यानंतर त्यांच्या अयोध्येत जाण्यासाठीची तयारी सुरू झाली होती. पण या दरम्यान, अचानक जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित धमकीचे पत्र समोर आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील कुर्हा येथील पोलिस ठाण्यामध्ये जगद्गुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना तात्काळ प्रशासनाकडून पोलिस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना विदर्भ पीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज निवेदन दिले.