पुणे : राज्यात सर्दी, ताप, खोकल्यासह कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार ‘जेएन १’ विषाणूचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सरसकट सर्व रुग्णांना ‘अँटिबायोटिक्स’ औषधे देण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य कोरोना टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. सहव्याधी आणि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या रुग्णांनाच अँटिबायोटिक्स औषधे द्यावीत, अशा सूचनाही टास्क फोर्सने राज्यातील सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत.
नव्याने आढळून येणा-या कोरोना रुग्णांच्या सरसकट रक्ताच्या तपासण्या करू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्यात. पूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह अन्त्यविधीसाठी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाला देण्यात येत होता.
मात्र, आता कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे रुग्णाचा मृत्यू झाला, तर मृतदेह रुग्णाच्या नातेवाईकांकडे द्यावा, सध्याच्या थंडीच्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला या प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत; तसेच ‘सारी’ आणि ‘जेएन१’ या विषाणूचेही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप याबरोबरच दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे या प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
टास्क फोर्सच्या सूचना…
– ताप, सर्दी, खोकला ही प्राथमिक लक्षणे असू शकतात.
– सहव्याधी नसलेल्या रुग्णांना अँटिव्हायरल औषधे देऊ नयेत.
– सर्व रुग्णांना अँटिबायोटिक्स देऊ नये.
– सर्व रुग्णांना ‘एचआरसीटी स्कॅन’ करण्याची गरज नाही.
– ‘सारी’च्या रुग्णांना ‘एचआरसीटी स्कॅन’ करता येईल मात्र, वारंवार करू नये.
– सर्व रुग्णांना ‘स्टेरॉईड’ देऊ नये.
– डिस्चार्ज देताना ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.
– सहव्याधी असलेल्या रुग्णांना तीन दिवसांकरिता ‘रेमडेसिव्हिर’ द्यावे.
– ‘सारी’ आणि सहव्याधी रुग्णांना पाच दिवसांकरिता ‘रेमडेसिव्हिर’ द्यावे.