मुंबई : देशात बेरोजगारीचा मुद्दा पुण एकदा तापला आहे. याविषयीचे विविध अहवाल समोर आल्यानंतर विरोधक केंद्रासह राज्य सरकारवर तुटून पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. देशात बेरोजगारीची समस्या आ वासून उभी ठाकली असताना, मोदी सरकार तरुणांना पकोडे तळायला सांगत आहे. मोदी सरकार नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लांचे फुकट दर्शन देत आहे. आम्हाला रामल्लांचे फुकट दर्शन नको, आम्हाला नोकरी हवी आहे, असे ते म्हणाले.
देशाची ८८ टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे, असे अहवाल अधिकृतपणे सांगतो, याचा अर्थ नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काय केले, असा सवाल राऊत यांनी केला. देशातील ८८ टक्के जनता जर नोकरीच्या शोधात आहे, असे अहवाला आधारे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळावर बोट ठेवले. या काळात नोकऱ्या का निर्माण झाल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा केली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली. या देशातील ८८ टक्के जनता जर नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात असेल तर हा संपूर्ण देशच बेरोजगार झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
भारताचे पंतप्रधान महाराष्ट्रात फार मोठ्या उदात्त हेतूने येत नाही. त्यांना सातत्याने प्रचारासाठी महाराष्ट्रात यावे लागते, असा चिमटा ही राऊत यांनी काढला. मोदी हे उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येतील राम मंदिराचा दृष्टीने प्रचार करत आहेत आणि महाराष्ट्रमध्ये येऊन येऊन राजकीय प्रचार करत आहेत. त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा धसका घेतल्याचे ते म्हणाले.