22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार अपात्रता : मुख्यमंत्री शिंदेसह आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

आमदार अपात्रता : मुख्यमंत्री शिंदेसह आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली : शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. जून २०२२ मध्ये प्रतिस्पर्धी गट उदयास आले तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत (आमदारांचे बहुमत) असल्याच्या आधारावर शिंदे गट हीच ‘खरी’ शिवसेना असल्याचे विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हिपलाही राहुल नार्वेकर यांनी अधिकृत व्हिप म्हणून मान्यता दिली. या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणा-या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली.

शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांना १० व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार २२ जानेवारी) नोटीस बजावली.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे शिंदे गटाला सांगण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणी करावी की कलम २२६ अंतर्गत हायकोर्टाने?, असे मुख्य न्यायाधीशांनी विचारले असता. हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठविल्यास निकालाला विलंब होण्याची भीती सिब्बल यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR