नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा सुरू झाली आहे. भारतातील अनेक सेलिब्रेटी या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, वेंकटेश प्रसाद, रवींद्र जडेजा आदी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. जगभरात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे आणि त्यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरिया यानेही आनंद व्यक्त केला आहे.
दानिश कानेरियाने सोशल मीडियावर एक व्हीडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात आजच्या सोहळा दिसत आहे. त्याने व्हीडीओवर जय श्री राम असेही लिहिले आहे. दानिश हा अमेरिकेतील हॉस्टन येथील मंदिरात गेला आहे आणि त्याच्यासोबत अनेक श्रद्धाळूही दिसत आहेत. या मंदिराच्या परिसरात रोषणाई केलेली पाहायला मिळतेय आणि फटाक्यांची आतषबाजी झालेली दिसतेय. दानिश व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज यानेही या सोहळ्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. केशव महाराज मैदानावर जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा जय सिया रामचं गाणं वाजवले जाते.. त्याने व्हीडीओ पोस्ट करून म्हटले आहे की, सर्वांना नमस्कार… दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांना आजच्या दिवसासाठी मी शुभेच्छा देतो. सर्वांना शांती, सौहार्द आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होवो. जय श्री राम