इस्लामाबाद : पाकिस्तानी हवाई दलाच्या मियांवली प्रशिक्षण तळावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. मियांवाली एअरबेसमध्ये अनेक दहशतवादी घुसले आणि त्यानंतर सलग अनेक स्फोट झाले आहेत. या हल्ल्याचा व्हीडीओ देखील समोर आला असून येथे झालेल्या स्फोटांमुळे एअरबेसमध्ये आग लागली आहे. तसेच एअरबेसवरून जोरदार गोळीबार आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहेत. दरम्यान, तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानचा प्रवक्ता मुल्ला मुहम्मद कासिम याने मियांवालीच्या एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांने दावा केला की, या हल्ल्यात आत्मघाती हल्लेखोर देखील सहभागी आहेत.
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क शाखा आयएसपीआरने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “४ नोव्हेंबरला सकाळी पाकिस्तानी हवाई दलाच्या मियांवली ट्रेनिंग एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला, जो सैन्याने लगेचच उधळून लावला. आयएसपीआरचे म्हणणे आहे की, या घटनेत सहा दहशतवादी सामील होते, त्यापैकी तीन एअरबेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मारले गेले आणि उर्वरित तिघांना वेळीच घेरण्यात आले. या हल्ल्यात एअरबेसवर उभ्या असलेल्या तीन विमानांचे नुकसान झाले.