वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भातील भारताच्या दावेदारीला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांची साथ मिळाली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे माल इलॉन मस्क म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्याला संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व न देणे हास्यास्पद आहे.
खरे तर, आफ्रिकेला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्यत्व देण्याच्या मागणीसंदर्भात संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटरेस यांच्या एका ट्विटवर विचारण्यात आलेल्य प्रश्नाला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी हे विधान केले आहे. एवढेच नाही, तर आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये पुनरावलोकनाची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एलन मस्क एक्सवर ट्विट करत म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांची समीक्षाकरण्याची आवश्यकता आहे. समस्या अशी आहे की, ज्यांच्याकडे (देशांकडे) खूप जास्त ताकद आहे, त्यांची (देश) ती सोडण्याची इच्छा नाही. जगात सर्वाधिक लोकसंख्या असूनही भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिलेले नाही, हे हास्यास्पद आहे. आफ्रिकेलाही एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थान द्यायला हवे. यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी ट्विट करत म्हटले होते की, सुरक्षा परिषदेत आफ्रिकेचा एकही स्थायी सदस्य नाही, हे आम्ही कसे स्वीकारावे?
जग सहज काही देत नाही
भारताचे परराष्ट्रमंत्री, एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासंदर्भात नुकतेच भाष्य केले होते. यानंतर इलॉन मस्क यांनीही भारताचे समर्थन केले आहे. जग कुठलीही गोष्ट सहजपणे देत नाही. कधी कधी मिळवावीही लागते असे जयशंकर यांनी म्हटले होते.
सर्वांत मोठा अडथळा चीन
भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीत सर्वात मोठा अडथळा चीन आहे. जर भारताला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्त्व मिळाले, तर आशिया खंडातील आपला प्रभाव कमी होईल, अशी भीती चीनला वाटते. यामुळे भारताला संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यत्वापासून दूर ठेवण्यासाठी तो नाना प्रकारच्या खेळी खेळत असतो.