मुंबई : रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी युट्यूबर एल्विश यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर सापांच्या विषाचा नशेसाठी वापर यासह अनेक आरोप यादववर करण्यात आलेले आहे. एल्विश यादव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात सहभागी झाला होता. यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून विरोधी नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका आणि आरोप केले जात आहेत. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, तो एक सेलिब्रेटी म्हणून आला असेल, जर हिशोब करायला लागलो तर महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे गणेशोत्सव असतो तेव्हा वेगवेगळ्या सेलिब्रीटी येत असतात. त्यावेळी एल्विश यादव कुठलातरी रिअॅलिटी शो जिंकला होता. अशा अनेक सेलिब्रीटी येऊन जातात. ज्यावेळी तो येऊन गेला तेव्हा त्याच्यावर कुठलाही आरोप नव्हता. त्यावेळी तो एक सेलिब्रेटी म्हणून आला असेल, आता त्याच्यावर आरोप आहे, म्हणून जर हिशोब करायला लागलो तर महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील. मुख्यमंत्र्यांवर आरोप लावण्याचे धंदे चाललेत. हे वैफल्यग्रस्त धंदे उबाठाचे लोक करत आहेत, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.