24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयनितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपसोबत मिळून जेडीयू सरकार स्थापन करेल हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात उलथापालथीचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आज मोठा बदल पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते. भाजपला हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली होती. पण, आता इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष जेडीयू पुन्हा भाजपसोबत जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे, नितीश कुमार यांनी पलटू कुमार अशी आपली प्रतिमा कायम ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इंडिया आघाडीमध्ये नेता आणि अजेंडा ठरवण्यावरून चर्चा रेंगाळत चालली होती. तसेच आरजेडीसोबत नितीश कुमार यांचे संबंध बिघडत चालले होते. त्यातच नितीश कुमार यांनी एनडीएशी बोलणी सुरू केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण पाहून नितीश कुमार यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. कुमार यांनी राज्यपालांना भेटून महागठबंधनसोबत बंधन तोडत असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे १८ महिन्यांपूर्वीच नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते आता परत भाजपसोबत जात आहेत. २०१७ मध्ये त्यांनी आरजेडीसोबत फारकत घेतली होती आणि भाजपसोबत आले होते. नितीश कुमार यांनी आतापर्यंत पाच वेळा आपल्या भूमिकेपासून कोलांटउडी मारली आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. मात्र, याबाबत नितीश कुमार यांना कसलीही फिकीर नसल्याचे जाणवते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR