27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रअध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला

अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला

सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

बारामती : सरकार हा अध्यादेश लवकरही काढू शकले असते, पण त्यासाठी जरांगेंना मुंबईत यावं लागलं. मग या सरकारने अध्यादेश काढला, त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे यावरून स्पष्ट झाले, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्याचा अध्यादेश सरकारने काढला असून तो मनोज जरांगे यांच्या हाती सुपुर्द केला. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांचे आभार देखील मानले आहेत.

तसेच धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या देखील आरक्षणाच्या मागण्या आहेत, असे देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले. मुस्लिम, धनगर समाजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्यासोबत आम्ही ताकदीने उभे राहू. त्यांनी नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला मराठा आंदोलनाचा प्रश्न अखेर राज्य सरकारकडून निकाली काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच त्यासंदर्भात अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. पण का केवळ अध्यादेश असून आरक्षण अद्याप मिळालेले नाही, असा सूर विरोधकांनी लावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय खळबळ माजण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडले जातात
बिहारमधील राजकीय घडामोडींना सध्या बराच वेग आला आहे. त्यातच आता नितीश कुमार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडले जातात. सत्ताधारी दडपशाही करीत असून त्यांच्या विरोधात आम्ही लढत राहू.

ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील
सध्या राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. पाऊस कमी झाला आहे, त्याचे नियोजन सरकारने करावे. लोक भेटून सांगत आहेत की छावण्या काढा. छावण्या काढण्याची गरज आहे. पण हे ट्रिपल इंजिन सरकार असंवेदनशील असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR