- पावणेदोनशे वर्षांपूर्वी ‘सीता स्वयंवर’ नाटकाच्या प्रयोगापासून मराठी रंगभूमीची वाटचाल सुरू झाली. विष्णुदास भावे यांनी ज्या दिवशी हा प्रयोग सादर केला, तो दिवस म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी आपण मराठी रंगभूमी दिन साजरा करतो. हा केवळ औपचारिक उत्सव नाही. पावणेदोनशे वर्षांच्या प्रवासात असंख्य रंगकर्मींनी मोठ्या मेहनतीने रंगभूमीची पालखी सजवली. ती पुढे नेण्यासाठी रंगकर्मी आणि प्रेक्षकांनी आपले खांदे सक्षम करण्याचा हा दिवस आहे.
नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण. तिसरी घंटा होताच मखमली पडदा सरकू लागतो, त्या क्षणी टोकाला पोहोचणारी उत्कंठा मराठी माणसाला नवीन नाही. रंगभूमीच्या या आकर्षणाला पावणेदोनशे वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. १८४३ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे पाच नोव्हेंबरला विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. म्हणूनच आजचा दिवस आपण मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. विष्णुदास भावे यांनी केलेल्या प्रयोगाला शंभर वर्षे उलटल्यानंतर म्हणजे १९४३ मध्ये पाच ते सात नोव्हेंबर या कालावधीत नाट्यक्षेत्रातील नामवंत सांगलीत एकत्र आले आणि त्यांनी या प्रयोगाचा शतक महोत्सव साजरा केला. त्यानिमित्त आयोजित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विनायक दामोदर सावरकर होते. आजही छोट्या-मोठ्या शहरांमध्ये कार्यरत असणारे रंगकर्मी पाच सप्टेंबरला एकत्र जमतात. वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेतात. चांगलं काम करणा-यांना सन्मानित करतात. पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा देतात. नाटकाच्या क्षेत्रात रंगमंचावर आणि पडद्यामागे काम करणा-या सर्वांच्याच दृष्टीने आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे.
गेल्या पावणेदोनशे वर्षांत रंगभूमीवर सातत्याने बदल घडत आले. संगीत नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतली. पौराणिक, ऐतिहासिक विषय मागे पडून कौटुंबिक आणि सामाजिक विषय रंगभूमीवर हाताळले जाऊ लागले. व्यावसायिक आणि समांतर रंगभूमीवर काम करणा-या असंख्य संस्था महाराष्ट्रात विकसित झाल्या. नाटकांच्या आणि एकांकिकांच्या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. त्यातून असंख्य संवेदनशील कलावंत, दिग्दर्शक, लेखक निर्माण झाले. दोन घटका करमणूक करणा-या नाटकांबरोबरच प्रेक्षकांच्या जाणिवा विकसित करणारी नाटकं रंगमंचित झाली. याच प्रवासात चित्रपटांचे क्षेत्र विकसित होऊन रंगभूमीवरील अनेक कलावंत-तंत्रज्ञांनी त्या क्षेत्रात यश मिळवले. यथावकाश छोट्या पडद्यावरील मालिकांचे विश्व कलावंतांसाठी खुले झाले. परंतु चित्रपट-मालिकांमधून काम करणारे अनेक कलावंत रंगभूमीशी कायम जोडलेले राहिले. काही कलावंतांनी रंगभूमी हेच आपलं मुख्य कार्यक्षेत्र मानलं आणि अन्य माध्यमांत तुलनेने मर्यादित सहभाग घेतला. हां-हां म्हणता मनोरंजनाच्या क्षेत्राने प्रचंड मोठ्या उद्योगाचे स्वरूप धारण केले.
माध्यमं आणखी वाढली. आज हे क्षेत्र मोबाईलच्या रूपाने रसिकांच्या तळहातावर आलंय. ‘वेबसिरीज’चा पर्याय उपलब्ध झालाय. इकडे रंगमंचावरही मोठी आर्थिक गुंतवणूक असलेली नाटकं येऊ लागलीत. या सर्व स्थित्यंतरांच्या अवस्थांमध्ये मराठी रसिकांनी रंगभूमीवरचं आपलं प्रेम अबाधित ठेवलंय. मनोरंजनासाठी नाटकाव्यतिरिक्त अन्य साधन नसण्याच्या काळापासून सर्व साधनांनी युक्त असण्याच्या काळापर्यंतचा प्रवास आपण केलाय; पण ‘नाटक ते नाटकच’ ही भावना इतक्या पिढ्यांनंतरही कायम आहे. नाटक म्हणजे सत्याचा आभास, असं म्हटलं गेलंय. रंगमंचाचा चौकोन इतका शक्तिशाली आहे की, संपूर्ण विश्व त्या चौकोनात सामावू शकतं. काळाचं आणि अवकाशाचं एक रंजक गणित नाटकात असतं. रंगमंचावर बगिचाचाही आभास निर्माण करता येतो आणि राजवाड्याचासुद्धा! त्याचप्रमाणे शंभर वर्षांची गोष्ट दोन तासांत सांगता येते. नाटक पाहणारा समूह ज्या काळात आणि ठिकाणी असतो, तिथून त्या समूहाला अलगद उचलून नाटक दुस-या काळात आणि स्थळी घेऊन जातं.
रंगमंचाची हीच ताकद अनेकांचा आकर्षणबिंदू ठरते. नाटक पाहणा-यांचा आणि करणा-यांचाही! ज्या समूहाला नाटक दाखवायचं, त्याच्या मानसिकतेचा आणि मूल्यव्यवस्थांचा अभ्यास करून दिग्दर्शक नाटकाची योजना करतो. कधी मोजकं तर कधी भरगच्च नेपथ्य लावतो. कधी संगीताची जोड देऊन आशय गडद करतो तर कधी प्रकाशाचा खेळ करून प्रेक्षकांना प्रसंगात गुंतवू पाहतो. मात्र, या सर्व तांत्रिक बाबींपेक्षा महत्त्वाचा ठरतो तो अभिनेताच. कारण काळ आणि अवकाशाची चौकट त्याला प्रत्यक्ष जगायची असते. अनुभवायची असते आणि प्रेक्षकांना ती अनुभवायला भाग पाडायची असते. प्रेक्षकांच्या नेहमीच्या वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणात त्यांना न्यायचं असेल, तर सर्वप्रथम नटाला ते वातावरण तयार करावं लागतं. याखेरीज प्रयोगाच्या ठिकाणाचा अंदाज घेऊन त्याला अभिनयाची शैली ठरवावी लागते. कुठे ध्वनिव्यवस्था पुरेशी नसते, तर कुठे प्रेक्षागृह प्रमाणापेक्षा मोठं असतं. अशा वेळी आपला आवाज, आपलं शारीरिक व्यक्तिमत्त्व पणाला लावून त्याला नाटकाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी लागते. शिवाय, टेक-रिटेकचा प्रश्न नसतो. प्रेक्षकांची पोचपावती नटाला जागेवर मिळत असते. या सर्व कारणांमुळे रंगमंचीय अभिनय वेगळा आणि महत्त्वाचा ठरतो. रंजन हा सर्व कलाप्रकारांप्रमाणे नाटकाचाही आत्मा आहे. अर्थात, रंजनमूल्य म्हणजे काय, याची संकल्पना व्यक्तीपरत्वे बदलते. विचारप्रवण नाटकात रंजन नसतंच असं नाही आणि तद्दन करमणूकप्रधान म्हणून रंगमंचित केलेल्या नाटकात रंजन असतंच असंही नाही. आपल्याकडे नाटकांची यावरून वर्गवारीही केली गेली.
प्रेक्षकांपर्यंत आशय पोहोचवण्यासाठी वेगवेगळे फॉर्म (घाट) अस्तित्वात आले. काही घाट परदेशी नाटकांमधून घेतले गेले तर काही आपल्या-कडील लोककलांचा आधार घेऊन तयार झाले. अभिनयशैलीतही वेळोवेळी बदल होत गेला. परंतु या सगळ्याचा हेतू एकच. तो म्हणजे, समोरच्या प्रेक्षकाला नाटकात गुंतवून ठेवणे. विनोदी नाटकांमध्येही वेगवेगळ्या शैली आल्या-गेल्या. कौटुंबिक विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले गेले. अतिवास्तववादी अभिनयापासून अतिनाट्यापर्यंत (मेलोड्रामा) अभिनयाचेही सगळे प्रकार मराठी रंगभूमीवर येऊन गेले. प्रायोगिक रंगभूमीने प्रचलित चाकोरीबाहेरचे घाट आणि अभिनयशैली हाताळली. सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीतील बदलांचे प्रतिबिंब नाटकांमध्ये उमटले. विषयांमध्ये वैविध्य आले. वेगवेगळे प्रवाह रंगभूमीवर सक्रिय असले तरी आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवायचे, हाच प्रत्येक प्रवाहाचा हेतू राहिला. सुरुवातीला रंगमंचावरच्या घराला तीनच भिंती आहेत, असं मानलं जात असे. प्रेक्षकांच्या बाजूला भिंत नाही, याचं भान नटांनी बाळगावं असा दंडक होता. कालपरत्वे नाटकातल्या घरालाही चौथी भिंत आहे; फक्त ती पारदर्शक आहे, असे मानले जाऊ लागले.
-राजीव मुळ्ये,
नाट्यलेखक-दिग्दर्शक