खंडणीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआयने केला बंद
मुंबई : प्रतिनिधी
माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनादेखील सीबीआयकडून क्लीनचीट मिळाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ माजवून देणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे सादर केला आहे.
आपल्या मालकीचा भूखंड बळकावण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अग्रवाल यांनी परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुनमिया आणि जैन यांना अटक झाली होती. मात्र सिंग यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली नव्हती.
सीबीआयने तपास केला बंद
मात्र २४ मार्च २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देते वेळी सिंग यांच्या विरोधातील पाचही एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांना अटकेपासून संरक्षणदेखील दिले होते. या प्रकरणी सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे अहवाल सादर करुन तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.