नवी दिल्ली : केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहेत. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही केंद्र सरकावर जोरदार टीका केली. अमोल कोल्हे यांनी महागाई, बेरोजगारी, राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा आदी मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले. यावेळी त्यांनी एक कविता सादर केली. या कवितेतून त्यांनी मोदी सरकार फक्त स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे रामललांची अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा केल्याचा आरोप केला आहे. त्यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी एका हिंदी कवितेतून सरकारवर टीका केली आहे. सरकार वास्तविक मुद्यांवर लक्ष केंद्रित करत नाही आणि राम मंदिराचा वापर करून लोकांचे लक्ष विचलित करत आहे असा टोलाही लगावला. खासदार अमोल कोल्हे यांच्या भाषणाचा व्हीडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांनी लिहिले. जेव्हा निवडणुका हे तुमचे जीवन असते, तेव्हा काय प्रतिष्ठा पणाला लागेल याची कल्पना करा. संसदेमधील भाषण शेवटपर्यंत ऐका. खासदार कोल्हे यांनी राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना ही कविता ऐकवली. मी राम मंदिरासाठी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा प्रश्न आला, तेव्हा कोणी विचारले की कलशाशिवाय प्राण प्रतिष्ठा कसा होऊ शकतो. म्हणून कोणीतरी म्हटले की जेव्हा निवडणूक हेच प्राण असते, तेव्हा कल्पना करा की प्रतिष्ठा किती धोक्यात असेल. लोक गोष्टी म्हणतील कारण ते त्यांचे काम आहे. तुम्ही लोकांचे ऐकत नाही, फक्त मनापासून बोला. तरीही आम्ही आनंदी होतो कारण ५०० वर्षांची स्वप्ने सत्यात उतरत होती आणि आमच्या आतला हिंदू जागृत झाला होता.
पाय-यांवर आल्या आठवणी
लोक मंदिराच्या पाय-या चढू लागले, पहिल्या पायरीवर आम्हाला महागाईची आठवण झाली. दुस-या बाजूला, वाढती बेरोजगारी. तिस-या बाजूला पत्रकारितेचा सिलसिला. चौथ्या बाजूला केंद्रीय यंत्रणांची संशयास्पद भूमिका. प्रत्येक पावलावर काहीतरी आठवत होते. कुठे १५ लाखांचा जुमला तर कुठे शेतक-यांचा रोष होता. कुठे महिला कुस्तीपटूंच्या वेदना होत्या, तर कुठे दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन होते. कुठे जातीयवाद होता, तर कुठे कॉर्पोरेटला अनुकूल सरकारचा चेहरा होता. हे सत्य असूनही आम्ही अंध भक्तांसारखे चालत राहिलो अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी केली.