25.7 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी शाळांचे स्वरूप बदलले पाहिजे : नीलम गो-हे

मराठी शाळांचे स्वरूप बदलले पाहिजे : नीलम गो-हे

अमळनेर : प्रतिनिधी
मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी मराठी शाळांचे स्वरूप देखील बदलले पाहिजे. इंग्रजी भाषा महत्त्वाची आहेच मात्र मराठी भाषेकडे लक्ष द्यायला हवे, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मराठी भाषा अनिवार्य व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. मराठी पाट्या, शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणे यासाठी प्रयत्न आहे. विधान परिषदेची उपसभापती या नात्याने सरकारला सूचना दिल्या आहेत. साने गुरुजी यांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत.

खरा तो एकची धर्म… या गीताप्रमाणे साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अमळनेरमध्ये त्यांचे स्मारक जरूर व्हावे पण यासोबत साने गुरुजींचे विचार समाजापर्यंत पोहोचण्यासाठी कथामाला घ्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
सोशल मीडियामुळे मराठी भाषेला जीवनदान मिळाले आहे. ओटीटीवर मराठी चित्रपट येत आहेत, ही सुखद बाब असली तरी मराठी चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन पाहिले पाहिजेत. मराठी भाषा व साहित्य क्षेत्राचे महत्त्व केवळ पुणे व मुंबई यासारख्या मोठ्या शहरांपुरते नाही. यंदाचे साहित्य संमेलन अमळनेरसारख्या शहरात होत आहे, ही स्वागतार्ह बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR