बंगळूरू : कर्नाटक सरकारने ओला आणि उबेर सारख्या ऑनलाइन टॅक्सी सेवांसाठी तसेच राज्यातील इतर टॅक्सी सेवांसाठी फिक्स भाडे लागू करण्याता निर्णय घेतला आहे. शहरातील वेगवेगळ्या टॅक्सी सेवांमध्ये जास्त पैसे आकारण्याच्या समस्या सोडवण्यासाठी एकसमान भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य परिवहन विभागाने शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहनांच्या किमतीनुसार हबे भाडे विभागण्यात आले आहे. दरांमध्ये किमान भाडे आणि प्रति किलोमीटर अतिरिक्त शुल्क देण्यात आले आहे. वाहनांच्या किमतीनुसार भाडे तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. 10 लाखांपर्यंतच्या वाहनांचे किमान भाडे 4 किमीसाठी 100 रुपये ठेवण्यात आले आहे, त्यानंतर प्रत्येक जास्तीच्या किलोमीटरसाठी 24 रुपये आकारले जातील.
त्याचप्रमाणे, 10 ते 15 लाख रुपये किंमतीच्या वाहनांसाठी, 4 किमीसाठी किमान भाडे 115 रुपये ठेवण्यात आले आहे आणि त्यापुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी 28 रुपये भाडे आकारले जाईल. 15 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी, 4 किमीसाठी किमान 130 रुपये भाडे आकारले जाईल, त्यानंतर पुढील अतिरिक्त किलोमीटरसाठी 32 रुपये भाडे आकारले जाईल. या अधिसूचनेत याप्रमानेच, सामान तसेच वेटिंग रेट आणि रात्रीच्या प्रवासासाठी आकारली जाणारी जास्तीचे शुल्क याविषयी देखील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.