27 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र प्रभारींसह काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला

महाराष्ट्र प्रभारींसह काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे येत्या २८ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक आहे. तसेच लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी अशाप्रसंगी भाजपात जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. रमेश चेन्नीथला यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

‘‘मी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बनल्यानंतर आज पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासोबत आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही महाविकास आघाडीबाबत त्यांच्यासोबत बातचित केली आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जागावाटप आणि इतर गोष्टींबाबत आज चर्चा केली’’, अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली.

शरद पवारांसोबत दोन तास चर्चा
‘‘ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी देखील आम्ही बातचित केली आहे. आम्ही लवकरात जागावाटप निश्चित करु. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झाली. शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा घडून आली. जवळपास दोन तास चर्चा झाली. आम्ही विस्तारात चर्चा केली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचा कार्यक्रम सुरु होईल. आम्ही सर्व एकत्रितपणे काम करु’’, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कोण?
यावेळी रमेश चेन्नीथला यांना राज्यसभेच्या ६ जागांच्या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न उपस्थित केला. पण त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देणे टाळले. यासाठी आमची आज बैठक आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच ‘‘राज्यसभेसाठी काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत’’, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR