दिल्ली : वन डे विश्वचषकात आज आशियाईतील दोन संघ आमनेसामने आहेत. बांगलादेश आणि श्रीलंका दोन्हीही संघांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. पण, श्रीलंकन संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम असून त्यांच्या चाहत्यांना एका चमत्काराची अपेक्षा आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकेला आज विजय मिळवावा लागेल. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने साजेशी सुरूवात केली. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. पण, एका वादग्रस्त विकेटमुळे अन् नाट्यमय घडामोडींमुळे ही लढत चर्चेत आली.
श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली. टाईम आऊटमुळे मॅथ्यूजला बाहेरचा रस्ता धरावा लागला पण टाईम आऊट म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा नियम काय सांगतो ते आपण इथे जाणून घेऊया. दरम्यान, फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने ‘टाईम आऊट’चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला.
पंचांनी बाद घोषित करताच वाद चिघळला अन् मॅथ्यूज आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. मॅथ्यूजला बाद घोषित करताच श्रीलंकन फलंदाजाचा पारा चढला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मॅथ्यूजने रागामध्ये हेल्मेट देखील फेकून दिले. मॅथ्यूज या निर्णयावर असहमत होता. त्याला विश्वासही बसत नव्हता.
पंचांनी बाद घोषित केल्यानंतर मॅथ्यूजने बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, नियमानुसार शाकीबने अपील केली अन् पंचांनी बाद घोषित केले. विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर हर्ट झाल्यानंतर येणार्या फलंदाजाला ३ मिनिटांत खेळपट्टीवर येऊन चेंडू खेळावा लागतो. तसे न झाल्यास विरोधी संघ फलंदाजाच्या विरोधात अपील करू शकतो.
खरं तर मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून फलंदाजीसाठी आला होता. पण चूक लक्षात आल्यानंतर त्याने हेल्मेट बदलले. पण यासाठी वेळ गेला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडूंनी त्याच्या विकेटसाठी अपील केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज हा पहिला खेळाडू ठरला आहे. सदीरा समरविक्रमा तंबूत परतल्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी आला होता.