26.7 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रनागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी तडकाफडकी निलंबित

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी तडकाफडकी निलंबित

नागपूर : वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबतचे आदेश दिले. अशाप्रकारे कुलगुरूंना निलंबित करण्यात आल्याची नागपूर विद्यापीठातील ही पहिलीच घटना आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, राज्यपाल बैस यांच्या कार्यालयात कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या विरोधातील वेगवेगळ्या तक्रारींच्या अनुषंगाने बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर त्यांना निलंबित करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. या संदर्भातील मेल बुधवारी सांयकाळी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाला. तसेच राज्यपालांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

विद्यापीठाने परीक्षांच्या कामातून एमकेसीएल कंपनीला बरखास्त केल्यानंतरही कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. चौधरी यांच्या निर्देशाने एमकेसीएल कंपनीला निविदा न काढता पुन्हा कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रद्द करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचना केल्यानंतरही एमकेसीएलचे काम कायम ठेवण्यात आले. याबाबतही राज्यपालांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्यपाल, तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने अहवालात डॉ. चौधरी यांच्या कारभारावर गंभीर तोशेरे ओढले होते. तत्कालीन राज्यपाल भगतंिसह कोश्यारीनंतर नव्याने आलेल्या रमेश बैस यांनाही हा अहवाल सादर करण्यात आला होता.

राजीनामा देण्याच्या होत्या सूचना
डॉ. चौधरी यांनी अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांनी कुलगुरू चौधरींना राजीनामा देण्यास सांगितले होते. गतवर्षी मार्च महिन्यात तशा चर्चा विद्यापीठ वर्तुळात होत्या. मात्र, डॉ. चौधरी यांनी राजीनामा दिला नाही.

चौधरी मुंबईत, बोकारे नागपुरात दाखल
राज्यपालांच्या आदेशानंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे बुधवारी रात्री ८ वाजेदरम्यान नागपूर विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी डॉ. चौधरी यांच्या अनुपस्थितीत प्रभारी कुलगुरु पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांकडून विविध विषयांची माहिती जाणून घेतली. मुंबईला सुनावणीसाठी गेलेले डॉ. चौधरी नागपुरात दाखल होण्यापूर्वीच डॉ. बोकारे यांनी गडचिरोली येथून नागपुरात दाखल होत कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे विद्यापीठ वर्तुळात मात्र तर्क वितर्क लावले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR