छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यातच पडेन, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे लवकरच छत्रपती संभाजीनगरच्या दौ-यावर येणार आहेत. मनोज जरांगे पाटील हेदेखील छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये येणा-या नेत्यांची पावले आपसूकच मनोज जरांगे पाटील यांच्याकडे वळताना दिसली आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट होणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाच्या पहिल्या टप्प्यात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. यामध्ये अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरूनच लाठीमार केला, असे आरोप झाले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकेरी भाषा वापरली होती. नंतरच्या काळातही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा लक्ष्य केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांना भेटणार का, असा प्रश्न मनोज जरांगे यांना बुधवारी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. शहरात कोणताही नेता आला की तुम्हाला भेटायला येतो.
मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येणार का, असे जरांगे-पाटलांना विचारण्यात आले. त्यावर मनोज जरांगे यांनी म्हटले की, त्यांनी मला भेटायला यायचं की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. मला बळंच भेटा, असं कसं म्हणणार. मला वाटतं त्यांनी आरक्षण घेऊन यावे आणि मला भेटावे. यावर पत्रकारांनी जरांगे पाटलांना विचारले की, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला भेटायला यावे, ही तुमची इच्छा आहे का? तुम्ही त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली, मग त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी यावे, अशी अपेक्षा कशी करता, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, मी कुठे म्हणालो फडणवीसांनी मला भेटायला यावे, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांनी आरक्षण घेऊन यावे, असे मी म्हटले. ते मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यातच पडेन, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
राज्यात इतकी वर्षे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा नेत्यांनीच समाजाचं वाटोळं केलं. ते मुख्यमंत्री असले म्हणून काय झाले? मराठा नेत्यांनी साथ न दिल्यामुळेच आमचं आरक्षण गेलं. पण आज समाजाच्या डोक्यात आल्यामुळे ते पुन्हा मिळत आहे.