लखनौ : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लखनौ पूर्व येथील आमदार आशुतोष टंडन यांचे गुरुवारी निधन झाले आहे. मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल लालजी टंडन यांचे ते पुत्र होते. आशुतोष टंडन हे काही दिवसांपासून आजारी होते. आशुतोष टंडन यांनी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात शहरी विकास, रोजगार आणि गरिबी निर्मूलन यांसारखी अनेक मंत्रालये हाताळली होती. २०१४ मध्ये त्यांनी लखनौ पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. २०२२ मध्ये ते तिसऱ्यांदा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आशुतोष टंडन यांच्या निधनावर दुःख केले आहे. एक्सवर योगी अधित्यनाथ यांनी म्हटले आहे की, एक लोकप्रिय, कष्टाळू आणि लढाऊ राजकारणी म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.