17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीय विशेषवयाची अट कशासाठी?

वयाची अट कशासाठी?

पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीत प्रवेश देताना सहा वर्षे पूर्ण केलेल्या बालकांनाच प्रवेश द्यावा असे निर्देश भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. हा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण बालकांचे वय एखादी गोष्ट समजून घेण्याच्या दृष्टीने योग्य असावे लागते. अमूर्त संकल्पना, एखाद्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी योग्य वयाची गरज असते. विशिष्ट वयात विशिष्ट क्षमता विकसित होत असतील तर बालकांना लवकर शाळेत घातल्याने त्या इयत्तेच्या अपेक्षित पाठ्यक्रमातील घटकांच्या आकलनास निश्चितच अडचणी येतात. साधारण चार वर्षांच्या बालकाला अमूर्त कल्पनांचे आकलन होत नाही. मात्र सहा वर्षाच्या बालकाला त्याच अमूर्त कल्पना अधिक लवकर आकलन होतात.

पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीत प्रवेश देताना सहा वर्षे पूर्ण केलेल्या बालकांनाच प्रवेश द्यावा, असे निर्देश भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना वयाचे समान धोरण नाही. त्यामुळे दहावी, बारावी पास होताना देशातील विद्यार्थ्यांचे वय देखील भिन्न असते. त्यामुळे काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना वयाच्या अटी आणि वय यातही विषमता अधोरेखित होत असते. आता पहिलीचे प्रवेशाचे वय सहा वर्षे केल्याने त्याचा परिणाम बालकांच्या शिकण्यावर होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिली पाच वर्षे पायाभूत स्तराची मानली गेली आहेत. त्यामुळे पहिलीत सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यास आठ वर्षे पूर्ण झालेला विद्यार्थी हा स्तर पूर्ण करेल. मुळात अभ्यासक्रम विकसित करताना प्रत्येक इयत्तेच्या बालकांचे निश्चित वय लक्षात घेतले जात असते. पुरेशा प्रमाणात शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास नसताना बालकाच्या हाती पाटी दिल्याने त्याचा परिणाम बालकाच्या शिक्षणावर होतो. त्यामुळे बालकांचे शैक्षणिक नुकसान होत असते. त्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असतो. हे नुकसान जितके बालकाचे व्यक्तिगत आहे तितकेच ते राष्ट्राचे देखील आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम भविष्यकाळात अत्यंत सकारात्मक होण्याची शक्यता आहे. मुळात बालकांचे वय जसे वाढत जाते त्याप्रमाणे विविध क्षमता विकसित होत असतात. शिकण्यासाठी लागणारे अवयव म्हणून आपण ज्यांचा विचार करतो ते देखील विशिष्ट वयात विकसित होत असतात. शिकण्याच्या दृष्टीने विचार करता लेखनासाठी लागणारी बोटे आणि त्यांचे स्नायू यात परिपक्वता हवी असते. वाचने, निरीक्षण करणे यासाठी नेत्रात सक्षमता हवी असते. हस्त-नेत्र समन्वयाची देखील गरज असते. अर्थ लावणे, तर्क करणे, अंदाज बांधणे, विश्लेषण करणे, विचार क्षमता असणे या गोष्टी देखील बालकांच्या वयानुरूप विकसित होत असतात.

वयाचा विचार न करता बालक कमी वयात शाळेत दाखल केले तर, अपेक्षित क्षमता नसताना ते शिकत राहते आणि त्याचा विपरित परिणाम बालकांच्या अध्ययनावर होत जातो. जगप्रसिद्ध बालमानस शास्त्रज्ञ जॉन पियाजे यांनी बालकांना जाणून घेण्यासंदर्भात विविध प्रयोग केले. कोणत्या वयात विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता विकसित होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकदा दोन भांडी घेतली. एक भांडे छोट्या आकाराचे व दुसरे मोठ्या आकाराचे होते. छोट्या आकाराचे भांडे पूर्ण पाण्याने भरले व मोठ्या भांड्यात कमी पाणी ओतले. त्याचे निरीक्षण करण्यास सांगून, कोणत्या भांड्यात अधिक पाणी आहे असा प्रश्न त्या बालकांना विचारला, तर बालके म्हणाली, मोठ्या भांड्यात अधिक पाणी आहे. हे उत्तर चुकीचे होते. याचा अर्थ बालकांना बुद्धी नाही असे होत नाही. असे सातत्याने बालकांना प्रश्न विचारले जात होते. बालक जे काही उत्तर देत होते त्या उत्तरात बालकांचा विचार होता, अंदाज होता; पण ते उत्तर चुकत होते. याचा अर्थ बालक चुकीचा विचार करत होते असे नाही, तर योग्य उत्तरासाठी लागणारी तार्किक क्षमता, विचारासाठी सक्षमता, विश्लेषण क्षमता ही विशिष्ट वयातच प्राप्त होत असते. त्यामुळे योग्य वय झाले की बालके अगोदरच्या चुकलेल्या प्रश्नांचे उत्तर देखील योग्य देत होती असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

बालकांचे वय एखादी गोष्ट समजून घेण्याच्या दृष्टीने योग्य असावे लागते. अमूर्त संकल्पना, एखाद्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी योग्य वयाची गरज असते. बालकांच्या विशिष्ट वयात विशिष्ट क्षमता विकसित होत असतील तर बालकांना लवकर शाळेत घातल्याने त्या इयत्तेच्या अपेक्षित पाठ्यक्रमातील घटकांच्या आकलनास निश्चित अडचणी येतात हे लक्षात घ्यायला हवे. साधारण चार वर्षांच्या बालकाला अमूर्त कल्पनांचे आकलन होत नाही. मात्र चार-पाच वर्षापेक्षाही सहा वर्षाच्या बालकाला त्याच अमूर्त कल्पना अधिक लवकर आकलन होतात. आरंभीच्या काळात ज्या गोष्टी, वस्तू प्रत्यक्ष दिसतात त्याच बालक स्वीकारते. बालकांना लवकर शाळेत घालण्यामागे त्यांचा अधिकाधिक विकास करण्याचा विचार पालक करत असतात. यामागे सारेच शिक्षण शाळेतच होते हे गृहित धरलेले असते. हे अर्थात गृहितकच चुकीच्या धारणेवरील आहे हेही लक्षात घ्यायला हवे. बालकांची शारीरिक वाढ जशी होत जाईल त्याप्रमाणात बद्धीची वाढ होत असते. प्रत्येक टप्प्यावर बालकांच्या विकासाचे क्षेत्र भिन्न असते. आरंभीच्या काळात बालकांच्या भाषिक विकासाला पुरेसे क्षेत्र खुले असायला हवे असते. शाळेपेक्षा त्यासाठी अधिकाधिक उत्तम वातावरण घरी असते. घरच्या वातावरणात बालक अधिक आणि विविध स्वरूपाचे भाषिक अनुभव घेत असते. परिसरात तशा अनेक संधी त्याला मिळत असतात.

तसेच अनेक गोष्टी हाताळण्यास मिळत असतात. अनुभवातील विविधता लक्षात घेऊन त्याच्या भाषिक विकासाला आरंभ होत असतो. घरच्या वातावरणात स्वातंत्र्य असते. आनंद, आत्मविश्वास मिळत असतो. या वयात बालक ऐकण्यापेक्षा अनुकरणातून अधिक शिकत असते. शाळेपेक्षा घर आणि परिसरात जर शिकण्याच्या अधिक संधी असतील तर मर्यादित अनुभवाच्या मागे का लागणे घडते याचा विचार करण्याची गरज आहे. बालकांच्या शिकण्यासाठी ज्या न्युरोन्सचा विचार केला जातो त्याचा विकास हा केवळ शाळेच्या अध्ययन अनुभवातून होतो असे नाही. जगण्यातील विविध अनुभवांतून विकासाला संधी मिळत असते. शिकण्यासाठी मेंदूला सतत नवे काही हवे असते. लहान वयात परिसरात अधिक चांगल्या अनुभवाच्या संधी मिळू शकतात. आपण जेव्हा बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा विचार न करता अभ्यासक्रमाचे ओझे लादत जातो तेव्हा त्याचा परिणाम शिकण्यावर होत असतो. असे लादणे घडत गेल्याने वयाला न झेपणा-या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत मग पालकांकडून रागावणे, मारणे, अपमान करणे बालकांच्या वाट्याला येत असते. त्यातून बालकांचा आत्मविश्वास हरवला जातो. त्यामुळे बालकांच्या भविष्यासाठीची वाट यातून कठीण करत जात आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आता या निर्णयामुळे किमान पालकांनी चूक करण्याचा प्रयत्न केला तरी शासनाच्या निर्णयामुळे ते घडू शकणार नाही.

शासनाने वय निश्चित केल्याने बालकांच्या शिकण्याला गती येण्यास मदत होईल. समान अभ्यासक्रम समान वयाची बालकं शिकणार असल्यामुळे सुयोग्य शारीरिक व बौद्धिक विकासाच्या सोबत हे घडणार आहे. त्यामुळे किमान शिकणे परिणामकारक होण्यास निश्चित मदत होईल. बालकांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा शास्त्रीयदृष्ट्या आठ वर्षे अधिक महत्त्वाची मानली गेली आहेत. त्यानुसार पहिली दोन वर्षे, दोन वर्ष ते सहा वर्र्ष आणि सहा ते आठ वर्ष हे टप्पे अधिक महत्त्वाचे मानले गेले आहेत. मुळात मेंदूच्या विकासाचा विचार आता शास्त्रज्ञ मांडू लागले आहेत. त्यांचे निष्कर्ष अधिक महत्वाचे ठरू पाहत आहेत. व्यक्तीच्या डाव्या व उजव्या मेंदूच्या मध्यभागी असलेल्या कॉपर्स कलोझमाचा विकास महत्त्वाचा असतो. वयाच्या आठ वर्षापर्यंत त्याचा पुरेसा विकास होत असतो. त्यासाठी मेंदूची मागणी होत असते. ती मागणी म्हणजे सातत्यपूर्ण हालचालीची. त्यामुळे खेळ हाच त्यासाठीचा प्रभावी मार्ग आहे. खेळ ही जर गरज असेल तर त्याला घरच्या वातावरणात अधिक संधी मिळण्याची शक्यता असते. पालक म्हणून आपण शास्त्रीय दृष्टिकोन जाणून न घेता केवळ स्वत:ची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बालकांवर काही लादत असतो. पालक स्वप्न लादत असल्याने बालकांचे शिक्षण होत नाही. जे झाल्यासारखे दिसते ते खरे शिक्षण नाही. तो पालकांसाठीचा भास आहे.

इतक्या लहान वयात असे अशैक्षणिक प्रयोग केल्याने बालकांची भविष्याची शिक्षणाची वाट आपण अधिक कठीण करत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना पालकांच्या इच्छा महत्त्वाच्या नसतात तर बालकांचा शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा टप्पा महत्त्वाचा असतो. त्यासाठी विशिष्ट वयात विशिष्ट स्वरूपाचा विकास होतो हे लक्षात घ्यायला हवे. विशिष्ट वयात विशिष्ट शिकणे होते. त्यामुळे लहान वयात क्षमता नसताना काही सक्तीने लादणे घडले तर त्यातून केवळ बालकाचे नाही तर राष्ट्राचे नुकसान होत असते. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय उद्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्यादृष्टीने या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे. पालकांनी देखील बालकाच्या आयुष्यातील आनंदाला अधिक महत्त्व द्यायला हवे. त्याचे वय खेळण्याचे असेल तर त्याला खेळू द्यावे. त्याच्या शैक्षणिक विकासासाठी घरातील विविध अध्ययन अनुभवाची नितांत गरजेचे असते. ते अनुभव वयाला अनुरूप असेच असतील तर बालकांवर सक्तीने काही लादण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भविष्य अंधारमय करणे आहे.

– संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR