वॉशिंग्टन : चिकुनगुनियासारख्या प्राणघातक आजारावर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जगातील पहिल्या लसीला मान्यता दिली आहे. डासांमुळे होणा-या रोगामुळे खूप ताप आणि सांधेदुखी होते आणि ते लहान मुलांसाठी घातक ठरू शकते. एफडीएच्या मंजुरीनंतर ही लस लवकरच जगभरात उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. सध्या चिकनगुनियाच्या उपचारासाठी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही.
या वर्षी केवळ सप्टेंबर महिन्यातच चिकुनगुनियाचे ४ लाख ४० हजार रुग्ण आढळून आले असून ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण हे दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आशियात आढळले आहेत. या लसीचे नाव इक्सचीक असून एफडीएनुसार १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना वापरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हे युरोपच्या व्हॅल्नेव्हाने विकसित केले आहे आणि या लसीचा एकाच डोस घ्यावा लागतो. जगभरात २००८ मध्ये ५० लाख प्रकरणे नोंदवली गेली. त्वचेची जळजळ, डोकेदुखी, स्नायू दुखणे याशिवाय त्याच्या लक्षणांमध्ये सांधेदुखीचाही समावेश होतो जो अनेक महिने किंवा वर्षे टिकू शकतो.